शिवाजी पार्क येथे पुस्तक प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रभादेवी : पुस्तक म्हणजे ज्ञानाचे भांडार आणि शब्दांचा अमूल्य साठा ही उक्ती सार्थ ठरवत दादरमधील शिवाजी पार्क येथे आयोजित पुस्तक प्रदर्शनाला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल आणि समाजमाध्यमांच्या वाढत्या प्रभावातही ‘वाचाल तरच वाचाल’ हा संदेश देणारे हे प्रदर्शन वाचकप्रेमींसाठी पर्वणी ठरले.
मराठी भाषा दिनाचे औचित्य साधत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या पुस्तक प्रदर्शनाला वाचकप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, हे प्रदर्शन रविवार (ता. १)पर्यंत खुले राहणार असल्याची माहिती यशवंत किल्लेदार यांनी दिली. या वेळी मनसेच्या शर्मिला ठाकरे यांच्या मातोश्री पदमश्री वाघ यांनीदेखील पुस्तक प्रदर्शनाला भेट देत आवडीची पुस्तके खरेदी केली. तसेच, साधारण १९६८ पासून पुस्तके वाचत असून, तेव्हापासून मॅजेस्टिक प्रकाशनाची सदस्य असल्याचे पदमश्री वाघ यांनी सांगितले. वाचनाची गोडी असून, आजही आमच्या घरात ८०० पुस्तके असून, ८०० पुस्तके लायब्ररींना भेट देण्यात आली असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.
या प्रदर्शनात विविध विषयांवरील हजारो पुस्तके उपलब्ध होती. साहित्य, कादंबरी, चरित्र, बालसाहित्य, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक पुस्तके, आध्यात्मिक आणि ऐतिहासिक ग्रंथ अशा अनेक विभागांमध्ये पुस्तके मांडण्यात आली होती. नामांकित ९२ प्रकाशन संस्थांसह नवोदित लेखकांनाही आपली पुस्तके सादर करण्याची संधी देण्यात आली आहे.
डिजिटल युगातही पुस्तकांविषयीचे प्रेम कायम असून, वाचनसंस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे. शिवाजी पार्कसारख्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा असलेल्या ठिकाणी भरलेले हे प्रदर्शन खऱ्या अर्थाने ज्ञानाची मेजवानी ठरेल, असे यशवंत किल्लेदार यांनी सांगितले. आजच्या मोबाईलच्या युगातही पुस्तक प्रदर्शनाला मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. पुस्तके खरेदी करण्यासाठी वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे मधुश्री पब्लिकेशनने सांगितले.