विरार (बातमीदार) ः नायगाव पूर्वपट्टीची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. वाढती लोकसंख्या, नायगाव उड्डाणपूल, वाहतुकीची वर्दळ वाढली आहे; पण नायगाव पूर्व परिसरातील जूचंद्र उड्डाणपूल, फाटकालगत जूचंद्र सबवेची कामे संथगतीने सुरू असल्याने स्थानिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. जूचंद्र रेल्वे फाटकावरील कोंडीची समस्या गंभीर बनल्याने माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक कन्हैया भोईर यांनी त्यांच्या शिष्टमंडळासह मध्य रेल्वे विभागाचे सहाय्यक अभियंता एल. सी. रावडे यांची पनवेल कार्यालयात भेट घेतली. या वेळी भोईर यांनी दोन्ही प्रकल्पांबाबत माहिती घेतली. तसेच जूचंद्र रेल्वे स्थानकावरील स्वच्छतागृह, तिकीट खिडकी नवीनीकरण, एफओबी, पाणपोईची सोयीसुविधांबाबत निवेदन दिले.