६०३ श्रीसदस्यांचे श्रमदान
मिरा-भाईंदर, नायगावात स्वच्छता अभियान
भाईंदर, ता. १ (बातमीदार) : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे मिरा-भाईंदर तसेच नायगाव परिसरात रविवारी महास्वच्छता अभियान राबवण्यात आले. या वेळी श्री सदस्यांनी ३२ किलोमीटर लांबीच्या रस्त्याची दुतर्फा सफाई करत १.५ टन कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावली.
कचऱ्यामुळे सर्वत्र अस्वच्छतेचे वातावरण निर्माण होते, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण होतो. रस्ते, सार्वजनिक ठिकाणे, आजूबाजूचा परिसर स्वच्छ राहावा, याबाबत जनजागृती करण्यासाठी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे मिरा-भाईंदर, नायगावमध्ये रविवारी स्वच्छता अभियान राबवण्यात आले. या मोहिमेत ६०३ श्रीसदस्य सहभागी झाले होते. या वेळी १.५ टन ओला, सुका कचरा स्वतंत्र गोळा करण्यात आला.