मालमत्ता करवसुलीसाठी धडक
५१३ मालमत्ता जप्त, १,२०६ जणांचा पाणीपुरवठा खंडित; थकबाकीदारांची नावेही होणार जाहीर
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १ : आर्थिक वर्ष २०२५-२६ अखेरच्या टप्प्यात असताना ठाणे महापालिकेकडे मालमत्ता करापोटी ६३० कोटी रुपये जमा झाले आहे. ९२० कोटींचे उद्दिष्ट गाठण्यासाठी २९० कोटी कर संकलन करण्यासाठी अवघ्या महिनाभराची मुदत आहे. त्यामुळे थकबाकीदारांवर ठाणे महापालिकेने धकड कारवाईला सुरुवात केली असून, ५१३ मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत, तर २२३ मालमत्तांना सील ठोकण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर कारवाईनंतरही कर थकवणाऱ्यांची नावे प्रसारमाध्यमातून जाहीर करणार आहेत.
मालमत्ता कर, पाणीपट्टी वसुली आणि शहर विकास विभागाकडे जमा होणारे शुल्क हे ठाणे महापालिकेचे प्रमुख उत्पन्न स्रोत आहे. मात्र, कोरोनानंतर पालिकेच्या तिजोरीमध्ये अपेक्षित कर जमा होत नसल्याचे दिसून आले आहे. खर्च आणि जमा होणारे उत्पन्न याचा ताळमेळ बसवताना प्रशासनाची दमछाक होत आहे. शहरात विविध विकास प्रकल्प सुरू असताना कर्मचाऱ्यांचे वेतन काढण्यासाठीही शासन निधीवर पालिकेला अवलंबून रहावे लागत आहे. त्यात झालेल्या कामांची आणि सेवा पुरवणाऱ्या ठेकेदारांची बिले काढतानाही प्रशासनाचा घाम निघत आहे. त्यामुळे आर्थिक वर्षाअखेरीच पालिनेने करवसुलीसाठी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार मालमत्ता कर विभागाला ९२० कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. वर्षाच्या सुरुवातीपासूनच करवसुलीसाठी प्रशासनाने प्रयत्न सुरू केले होते. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीत ६३० कोटी रुपयांचा मालमत्ता कर जमा झाला आहे. मात्र, उद्दिष्ट पूर्तीसाठी अजून २९० कोटी रुपये कमी पडत आहेत. त्यामुळे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी थकबाकीदारांवर कारवाई अधिक तीव्र करण्याचे तसेच मोठ्या थकबाकीदारांची नावे प्रसारमाध्यमांतून जाहीर करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले आहेत. त्यानुसार मालमत्ता कर विभागाकडून थकीत करदात्यांना नोटीस व वॉरंट बजावण्यात येत आहेत. त्यानंतरही कर न भरल्यास मिळकत जप्त करणे, सील करणे तसेच आवश्यकतेनुसार जाहीर लिलावाद्वारे विक्री करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
आतापर्यंतची कारवाई
५१३ मालमत्ता जप्त
२२३ मालमत्ता सील
१२०६ थकबाकीदारांचा पाणीपुरवठा खंडित
सुट्टीच्या दिवशीही संकलन केंद्रे सुरू
करदात्यांना सोयीचे व्हावे यासाठी ३१ मार्च २०२६ पर्यंत सर्व प्रभाग स्तरावरील संकलन केंद्रे
प्रत्येक शनिवारी सकाळी १०.३० ते सायं. ४.३०
प्रत्येक रविवारी सकाळी १०.३० ते दुपारी १.३०
या वेळेत सुरू ठेवण्यात आली आहेत. ठाणे शहरातील २१ संकलन केंद्रांपैकी कोणत्याही केंद्रावर कर भरता येणार आहे.
ऑनलाइन भरण्याचीही सुविधा
करदात्यांना घरबसल्या कर भरण्यासाठी :
अधिकृत संकेतस्थळ तसेच व्हॉट्सॲप चॅटबॉट (९१ २२२५३३१५९०) यांच्या माध्यमातून देयक पाहणे व कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
प्रशासनाचे आवाहन
महापालिकेच्या विकासकामांसाठी मालमत्ता कर हा प्रमुख उत्पन्न स्रोत असल्याने सर्व करदात्यांनी थकीत कर तातडीने भरून महापालिकेस सहकार्य करावे अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट इशारा ठाणे पालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.