महसूल समाधान शिबिरांची तालुक्यात सुरुवात
मनोर, ता. १ (बातमीदार) : नागरिकांची प्रलंबित कामे तत्काळ निकाली काढून महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख व पारदर्शक करण्याच्या उद्देशाने पालघर तहसील कार्यालय यांच्या वतीने ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ अभियान (टप्पा क्र. १) राबविण्यात येणार आहे. या विशेष उपक्रमांतर्गत महसूल विभागाच्या विविध सेवा नागरिकांना गावपातळीवरच उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
१८ फेब्रुवारी ते ५ मार्च २०२६ या कालावधीत मंडळ स्तरावर पूर्वतयारी सुरू असून, त्यानंतर तालुक्यातील विविध मंडळ मुख्यालयांवर टप्प्याटप्प्याने समाधान शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. या शिबिरांमध्ये प्रलंबित फेरफार प्रकरणांचा निपटारा, ७/१२ मधील त्रुटी दुरुस्ती, संगणकीकृत ७/१२ व ८-अ उताऱ्यांचे वितरण, उत्पन्न, रहिवासी व जात प्रमाणपत्रे, अकृषीक परवानगीसंबंधी मार्गदर्शन, सनद प्रक्रिया माहिती, सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे लाभ, विद्यार्थ्यांना दाखले वितरण, घरांसाठी पट्टेवाटप, ई-मोजणी अर्ज, ॲग्रीस्टॅक व पी. एम. किसान नोंदणी, तसेच गाव तप्तर अद्ययावत करणे आदी विविध कामे केली जाणार आहेत.
नागरिक, शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी व महिलांनी संबंधित तारखांना आवश्यक कागदपत्रांसह आपल्या मंडळ मुख्यालयी उपस्थित राहून शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी शाम मदनूरकर यांनी केले आहे. या उपक्रमामुळे महसूल विषयक कामे गाव स्तरावर त्वरित, पारदर्शक व सुलभ पद्धतीने पूर्ण होतील, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. शिबिरांच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने पालघर तहसीलदार कार्यालय येथे नुकतीच तालुक्यातील सर्व गावांचे सरपंच, पोलिस पाटील, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी, मुख्याध्यापक, मंडळ कृषी अधिकारी, ग्रामरोजगार सेवक व सीएससी केंद्रचालक यांची समन्वय बैठक पार पडली.
मंडळनिहाय शिबिरांच्या तारखा :
७ मार्च २०२६ - माहिम मंडळ, १४ मार्च २०२६ - मनोर मंडळ, २० मार्च २०२६ - सफाळे मंडळ, २७ मार्च २०२६ - लालोंडे मंडळ, १० एप्रिल २०२६ - बोईसर मंडळ, १७ एप्रिल २०२६- तारापूर मंडळ, २४ एप्रिल २०२६ - आगरवाडी मंडळ, ३० एप्रिल २०२६ - दहिसर तर्फे मनोर मंडळ, ८ मे २०२६ - पालघर मंडळ व १५ मे २०२६ - कोळगाव मंडळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.