रद्दी संकलनातून मानसिक रुग्णांच्या पुनर्वसनाला बळ
टिळकनगर गणेशोत्सव मंडळाचा स्तुत्य उपक्रम
डोंबिवली, ता. १ : सामाजिक बांधिलकी जपत डोंबिवलीतील टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने जुन्या वर्तमानपत्रांच्या संकलनातून एका अनोख्या उपक्रमाला सुरुवात केली आहे. ‘मनोदय ट्रस्ट’च्या पुनर्वसन कार्याला हातभार लावण्यासाठी राबवलेल्या या मोहिमेत अवघ्या एका तासात नागरिकांनी ७५ ते ८० किलो रद्दी जमा केली.
डोंबिवलीतील मनोदय ट्रस्ट गेल्या १७ वर्षांपासून मानसिक रुग्णांसाठी ‘फिनिक्स’ हे पुनर्वसन केंद्र चालवत आहे. येथे रुग्णांना स्वावलंबी बनवण्यासाठी वर्तमानपत्रांपासून कागदी पिशव्या तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. या पिशव्यांची विक्री पोळी-भाजी केंद्रे व औषध विक्रेत्यांना केली जाते. या उपक्रमासाठी दरमहा सुमारे १५० किलो रद्दीची आवश्यकता असते, जी पूर्ण करण्यासाठी मंडळाने पुढाकार घेतला आहे.
मंडळाने आपल्या कार्यालयात रद्दी संकलनासाठी विशेष मोहीम राबवली. या पहिल्याच उपक्रमाला टिळकनगरमधील रहिवाशांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रद्दी संकलनासोबतच मंडळ गेल्या तीन वर्षांपासून ‘ऊर्जा फाउंडेशन’च्या सहकार्याने इतरही उपक्रम राबवत आहे. प्लॅस्टिक कचरा, जुने कपडे आणि ई-कचरा संकलनालाही मोठा प्रतिसाद लाभला. प्लॅस्टिक पिशव्यांना पर्यावरणपूरक पर्याय देणे आणि मानसिक रुग्णांच्या आयुष्यात नवी उमेद निर्माण करणे, अशा दुहेरी हेतूने ही मोहीम राबवली जात आहे.
दर महिन्याला आयोजन
पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक ऋण फेडण्यासाठी आम्ही हे उपक्रम राबवत आहोत. ऊर्जा फाउंडेशन आणि मनोदय ट्रस्टसाठी रद्दी संकलन ही मोहीम आता दर महिन्याला नियमितपणे आयोजित केली जाईल, असे प्रमुख समन्वयक प्रतीक वेलणकर यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.