कर्जत तालुक्याचा विकास रखडलेलाच
कर्जत-नेरळ-कल्याण राज्य मार्गाची दुरवस्था
कर्जत : कैलास म्हामले (बातमीदार)
कर्जत, नेरळ, बदलापूर व अंबरनाथ शहरांना जोडणारा कर्जत-कल्याण राज्य मार्ग क्र. ७६ गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्थेत असून, खड्डेमय रस्ता, अपूर्ण कामे व तांत्रिक दोषांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विकासाच्या नावावर राजकारण होत असले तरी प्रत्यक्षात रस्त्याच्या कामाबाबत कोणतीही ठोस हालचाल होत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. विकासपुरुष म्हणवणारे लोकप्रतिनिधींच्या विकासाच्या व्याख्येत हा रस्ता येत नाही का, असा संतप्त सवाल केला जात आहे.
या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम २०१६ साली पी. पी. खारपाटील या ठेकेदार कंपनीमार्फत सुरू करण्यात आले. यानंतर तब्बल १० वर्षे उलटूनही काम पूर्ण झाले नसून, अनेक ठिकाणी रस्ता अर्धवट अवस्थेत आहे. काही भाग सिमेंट काँक्रीट तर काही भाग डांबरीकरण असा विस्कळित प्रकार दिसून येतो. पुलांची कामेही अपूर्ण असून अनेक ठिकाणी रस्ता अरुंद व धोकादायक बनला आहे.
देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असली तरी कर्जत व खालापूर येथे कार्यालय असताना कामकाज उरण उपविभागाकडे दिल्याने नागरिकांना तक्रारीसाठी दूर जावे लागते. त्यामुळे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
नेरळ विद्यामंदिर ते माथेरान गेट परिसर, शेलू कमान, उमरोली, वडवली, सावरगाव व वांजळे परिसरात रस्त्याची अवस्था अत्यंत खराब असून, नेरळ पोलिस स्टेशनजवळील पुलाला तडे गेल्याने एक पूल बंद आहे. अरुंद पुलामुळे वाहतूक कोंडी व अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
गेल्या सात-आठ वर्षांत झालेल्या अपघातांप्रकरणी अधिकारी व ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. वन विभागाच्या परवानग्यांअभावी रखडलेल्या कामांबाबत स्पष्टीकरण देण्याचीही मागणी करण्यात आली आहे. पुढील काही दिवसांत मोठे जनआंदोलन उभारण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी दिला असून, प्रशासनाने तातडीने काम पूर्ण करावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
याबाबत संबंधित सार्वजनिक बांधकाम उपविभाग उरण कार्यालयाचे अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.
#############चौकट
दुचाकीस्वाराचा पुलाच्या कठड्यावर आदळून नाल्यात पडल्याने मृत्यू
कर्जत-कल्याण राज्य मार्गावर नेरळ पोलिस ठाण्याजवळील पुलावर झालेल्या भीषण अपघातात १ मार्चला नेरळ येथील मोहाची वाडी परिसरातील रहिवासी चंद्रकांत ऐनकर (४५) यांचा जागीच मृत्यू झाला. चंद्रकांत ऐनकर हे दुचाकीवरून नेरळ बाजारातील काम आटोपून आपल्या घरी परत जात होते. या वेळी नेरळ पोलिस ठाण्याजवळील पुलावर त्यांच्या दुचाकीची पुलाला जोरदार धडक बसली. ती धडक इतकी भीषण होती की ते पुलावरून खाली कोसळले आणि गंभीर दुखापतीमुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
या ठिकाणी दोन पूल असले तरी त्यांना जोडणारा रस्ता अत्यंत अरुंद व एकपदरी आहे. रस्ते रुंदीकरणातील तांत्रिक त्रुटींमुळे हा भाग वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. याच त्रुटींमुळे हा अपघात झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, नागरिकांकडून तातडीने सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
#################
हा रस्ता संपूर्ण सिमेंट काँक्रीटीकरणचा असूनसुद्धा अर्धा डांबरीकरण व अर्धा सिमेंट काँक्रीट का झाला? कित्येक ठिकाणी रस्ता अर्धवट आहे. तीन ते चार ठिकाणी पुलाचे काम अर्धवट आहे. गेली अनेक वर्षे आम्ही या रस्त्यासंदर्भात आवाज उठवीत आहोत. मात्र प्रशासन याबाबत दुर्लक्ष करीत आहे. १० वर्षांत ठेकेदाराकडून काम पूर्ण झाले नसून अनेक ठिकाणी त्रुटी आहेत. याबाबत पुढील दिवसांत मोठे जनआंदोलन उभारून रस्ता रोको केला जाईल, याची प्रशासनाने नोंद घ्यावी.
- गोरख शेप, अखिल भारतीय मानवधिकार संघटना, रायगड जिल्हा अध्यक्ष
##################
फोटो : गोरख शेप, अखिल भारतीय मानवधिकार रायगड जिल्हा अध्यक्ष.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.