ठाण्याच्या चेंदणी कोळीवाड्यात पारंपरिक होळी
नवदाम्पत्यांच्या हस्ते पूजन; ढोल-ताशांचा गजर, कोळी गीतांनी परिसर दुमदुमला
ठाणे, ता. ३ (बातमीदार) : ऐतिहासिक वारसा लाभलेल्या ठाण्यातील चेंदणी कोळीवाडा परिसरात यंदाही होळीचा सण अत्यंत पारंपरिक आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. कोळी संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या या उत्सवात गावातील नवविवाहित जोडप्यांच्या हस्ते होळीचे विधिवत पूजन करण्याची परंपरा यंदाही श्रद्धेने जपण्यात आली.
कोळीबांधवांमध्ये होळी सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गावाच्या सुख-समृद्धीसाठी आणि नवदाम्पत्याच्या आयुष्यात आनंद नांदावा, या उद्देशाने पार पाडल्या जाणाऱ्या या पूजनात संपूर्ण गाव सहभागी झाले होते. महिलांनी परिधान केलेल्या नऊवारी साड्या आणि पुरुषांची पारंपरिक कोळी वेषभूषा यामुळे उत्सवाला एक वेगळीच रंगत आली होती. होळी रे होळी, पूर्णाची पोळी अशा जयघोषाने आणि पारंपरिक कोळी गीतांच्या सुरावटींनी संपूर्ण परिसर भारावून गेला होता. सोहळ्याला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवरांनी हजेरी लावली. यामध्ये प्रामुख्याने महापौर शर्मिला पिंपळोलकर, आमदार संजय केळकर, माजी खासदार राजन विचारे याचबरोबर पवन कदम, विशाल वाघ, उषा विशाल वाघ, पल्लवी कदम, नम्रता कोळी, प्रतिभा मढवी, डॉ. राजेश मढवी, जयेंद्र कोळी यांनी उपस्थिती लाभली. या वेळी आयोजकांच्या वतीने उपस्थित सर्व पाहुण्यांचा पारंपरिक कोळी टोपी घालून यथोचित सत्कार करण्यात आला.
सामाजिक ऐक्याचा संदेश
लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनीच होळीच्या अग्नीला प्रदक्षिणा घालत एकमेकांना शुभेच्छा दिल्या. चेंदणी कोळीवाड्यातील ही होळी केवळ धार्मिक विधी नसून सामाजिक ऐक्य आणि संस्कृती जतन करणारा एक मोठा सोहळा ठरला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.