मुरबाड, ता. ३ (बातमीदार) : तालुक्यातील नढई ग्रामपंचायतीत १५ लाख ४४ हजार रुपयांच्या अपहाराचा ठपका ठेवत संबंधित रक्कम वसूल करण्यासाठी मुरबाड पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी तत्कालीन सरपंच कमल दाजी टोहके आणि ग्रामपंचायत अधिकारी संतोष आत्माराम भावर्थे यांना नोटीस बजावली आहे. निर्धारित रक्कम न भरल्यास दोघांविरुद्ध कायदेशीर तसेच फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
२०२२-२३ या आर्थिक वर्षातील ग्रामपंचायतीचे लेखापरीक्षण सहाय्यक संचालक, स्थानिक निधी लेखापरीक्षक कार्यालय, ठाणे यांच्यामार्फत करण्यात आले होते. या लेखापरीक्षणात ग्रामनिधीतील सहा लाख ७७ हजार ४२३ रुपये आणि पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतील पाच लाख ४९ हजार ४८८ रुपये असा एकूण १२ लाख २६ हजार ९११ रुपयांचा कायमस्वरूपी अपहार झाल्याचे निष्पन्न झाले. तसेच तीन लाख १७ हजार ९२० रुपयांचा संशयित अपहार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यामुळे एकूण अपहाराची रक्कम १५ लाख ४४ हजार रुपये इतकी ठरते. या अनुषंगाने संबंधित दोघांनी समसमान रक्कम म्हणून प्रत्येकी सात लाख ७२ हजार ४१६ रुपये ग्रामपंचायतीकडे जमा करावेत, असे निर्देश गटविकास अधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र, अद्याप ही रक्कम भरणा केली नसल्याने पुढील वसुलीची प्रक्रिया सुरू करण्याचे संकेत देण्यात आले आहेत.
दोन वर्षांपूर्वी तक्रार
दोन वर्षांपूर्वी गावचे सरपंच, उपसरपंच, काही सदस्य आणि ग्रामस्थांनी पंचायत समितीकडे या प्रकरणी तक्रार अर्ज दाखल केला होता. त्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशीचे आदेश देण्यात आले होते. १५ मे २०२४ रोजीच्या गोपनीय लेखापरीक्षण अहवालाच्या आधारे ही कारवाई केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या कारवाईमुळे ग्रामपंचायत वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, पुढील घडामोडीकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.