कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले
चौकशी करून ठोस उपाययोजना करण्याची नरेश म्हस्के यांची मागणी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३ : शिमग्याच्या सणासाठी मोठ्या प्रमाणात ठाणे-मुंबईतील चाकरमानी एसटी बससह रेल्वेने गाव गाठत असतात. त्यानुसार यंदाच्या वर्षीदेखील शिमाग्यासाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांना रेल्वेच्या कोलमडलेल्या वेळापत्रकाचा फटका बसल्याचे दिसून येत आहे. कोकण रेल्वेच्या सात ते पाच तास विलंबाने गाड्या धावत आहेत. यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड संताप आणि नाराजीची लाट आहे. विलंबाने धावणाऱ्या रेल्वे गाड्यांमुळे लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिकांना प्रचंड मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. खासदार नरेश म्हस्के यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि कोकण रेल्वेचे चेअरमन यांना खरमरीत पत्र लिहीत कायमस्वरूपी ठोस तोडगा काढण्याची सूचना केली आहे.
नरेश म्हस्के यांनी म्हणाले की, कोकण रेल्वेमार्गावर धावणाऱ्या बहुतांश प्रमुख गाड्या या निर्धारित वेळेपेक्षा तासन्तास उशिराने धावत असून, ही बाब आता अपवाद नसून रोजचीच समस्या बनली आहे. या सततच्या विलंबामुळे प्रवाशांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यावर गंभीर परिणाम होत असून, मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. रविवारी (ता. १) प्रीमियम समजली जाणारी सुपरफास्ट तेजस एक्स्प्रेस ही गाडी सुमारे सात तास उशिराने धावत होती. तिकिटात जेवणाचा समावेश असूनसुद्धा प्रवाशांना जेवण मिळालेले नाही. तेजससारख्या प्रतिष्ठित गाडीची ही अवस्था असेल, तर इतर एक्स्प्रेस व प्रवासी गाड्यांची स्थिती किती बिकट असेल याची कल्पना करता येणे कठीण असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. गाड्यांच्या विलंबनाबाबतची एसएमएस सूचना प्रणाली पूर्णपणे अविश्वसनीय ठरत असल्याची तक्रारही त्यांनी केली आहे. अनेक प्रवाशांना वेळेवर कोणतीही माहिती न मिळाल्याने त्यांना रेल्वे स्थानकांवर तासन्तास प्रतीक्षा करावी लागत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले आहे.
तांत्रिक सुधारणेवर भर द्यावा
होळी, पालखी त्यानंतर मे महिन्याची सुट्टी आणि येणाऱ्या सण-उत्सवानिमित्त लाखो कोकणवासी रेल्वेने आपल्या गावी जात असतो. कोकण रेल्वेचा प्रवास हा सुखकर आणि सुरक्षित असल्याची प्रवाशांची भावना आहे. रेल्वेमुळे प्रवासातील वेळेचीही बचत होत असते. त्यामुळे लाखो कोकणकर रेल्वे प्रवासाला प्राधान्य देत असतात. त्यामुळे प्रवाशांच्या भावनेचा आदर करून कोकण रेल्वे प्रशासनाने केवळ तात्पुरत्या उपाययोजनांवर न थांबता वेळेचे काटेकोर नियोजन प्रभावी करून तांत्रिक सुधारणेवर भर देऊन प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.