माजिवडा परिसरात रस्ता खचला
खड्ड्यात ट्रकचे चाक रुतले
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३ : शहरातील पायाभूत सुविधांबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी घटना सोमवारी (ता. २) माजिवडा परिसरात घडली. गजबजलेल्या रस्त्याचा अचानक मोठा भाग खचल्याने काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता. या खड्ड्यात एका मालवाहू ट्रकचे मागील चाक अडकल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही.
ही घटना ठाणे शहरातील माजिवडा परिसरात, गोल्डन डाईज नाका येथे घडली. आयबी आयर्न मार्टसमोरील रस्त्याचा काही भाग अचानक खचल्याने रस्त्यावर खड्डा तयार झाला. त्याच वेळी त्या मार्गावरून जात असलेल्या ट्रकचे चाक या खड्ड्यात अडकले. ट्रक कलंडण्याची भीती निर्माण झाल्याने नागरिकांनी तत्काळ पोलिसांना आणि महापालिकेला कळविले. या घटनेची माहिती मिळताच कापूरबावडी पोलिस ठाण्याचे कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि महापालिकेच्या संबंधित विभागांचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. जेसीबीच्या सहाय्याने अडकलेला ट्रक सुरक्षित बाहेर काढण्यात आला. त्यानंतर परिसर सुरक्षेच्या दृष्टीने बंद करून खचलेल्या भागाची पाहणी करण्यात आली. दरम्यान, गजबजलेल्या या मार्गावर अचानक घडलेल्या प्रकारामुळे काही काळ वाहतूक विस्कळित झाली होती. पोलिसांनी वाहतूक वळवून परिस्थिती नियंत्रणात आणली. महापालिकेकडून तात्पुरती दुरुस्ती करून रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
अहवाल देण्याचे निर्देश
रस्त्याखालील जलवाहिनी किंवा गटार वाहिनीत गळती झाल्यामुळे मातीची धूप होऊन पोकळी निर्माण झाली असावी, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. काही महिन्यांपूर्वी या भागात पाइपलाइनचे काम झाले असल्याचे स्थानिकांनी सांगितले. मात्र, नेमके कारण तपासाअंतीच स्पष्ट होणार असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या असून, दुरुस्ती कामाचा अहवाल आपत्ती व्यवस्थापन कक्षाला सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.