सफाई कामगाराची दीड लाखांची सोन्याची चेन लंपास
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३ : ठाणे शहरात सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. हिरानंदानी मेडोज या परिसरात दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी ठाणे महापालिकेच्या एका सफाई कामगाराच्या गळ्यातील सुमारे एक लाख ३० हजार रुपये किमतीची सोन्याची चेन खेचून पळ काढल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी चितळसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वर्तकनगर येथे राहणारे सागर बारिया (वय २६) असे तक्रारदार याचे नाव आहे. शनिवारी (ता. २८) रात्री सागर बारिया हे घरातून जेवण करून दुचाकीत पेट्रोल भरण्यासाठी माजिवडा येथे गेले होते. त्यानंतर हिरानंदानी मेडोज परिसरातून परत आपल्या राहत्या घरी येत असताना रस्त्यावर त्यांच्या पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या दुकलीने त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन खेचून पोबारा केला. बारिया यांनी आरडाओरडा करून त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला; मात्र ती दुकली वेगाने पसार झाली. दोघेही अंदाजे ३० ते ३२ वर्षे वयोगटातील असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी चितळसर पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील वरुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.