विज्ञानदिनानिमित्त रंगला ‘खेळ १० पैठण्यांचा’
आगरवाडी शाळेत विज्ञान प्रदर्शन, खाद्य जत्रा आणि महिलांसाठी विशेष उपक्रम
पालघर, ता. ३ (बातमीदार) : सफाळे पश्चिम येथील ग्रामीण विद्या विकास वर्धिनी मंडळ, लायन्स क्लब ऑफ बॉम्बे वेस्ट संचलित इंग्रजी माध्यम शाळा, आगरवाडी येथे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त ‘विज्ञान प्रदर्शन’, ‘खाद्य पदार्थ जत्रा’ आणि ‘खेळ पैठणीचा’ असे विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले.
विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेचे कार्याध्यक्ष चिंतामण ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी आयोजित या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विविध विज्ञान प्रयोग, ऐतिहासिक किल्ल्यांची प्रतिकृती, पृथ्वी संवर्धन, प्रदूषणाचे दुष्परिणाम, घरांचे विविध प्रकार तसेच चित्रकला, शिल्पकला आणि हस्तकलेचे नमुने सादर करण्यात आले. यानंतर खाद्यपदार्थ जत्रेचे उद्घाटन संस्थेचे संचालक भरत चौधरी यांच्या हस्ते झाले. विद्यार्थ्यांनी घरगुती पद्धतीने तयार केलेले विविध खाद्यपदार्थ विक्रीसाठी आणले होते. ग्राहकांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून विद्यार्थ्यांना समाधान लाभले. या उपक्रमामागील उद्देश विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान आणि गणिती आकडेमोडीचा अनुभव मिळावा हा होता.
‘खेळ पैठणीचा’ हा विशेष कार्यक्रम महिला पालकांसाठी आयोजित करण्यात आला होता. प्रमुख पाहुण्या म्हणून नियुक्ती शुभम पाटील उपस्थित होत्या. निवेदिका लतिका पंकज पाटील यांनी विविध खेळांचे आयोजन केले. या स्पर्धांमधून १० विजेत्या महिलांना पैठणी प्रदान करण्यात आली. दैनंदिन जबाबदाऱ्यांमधून विरंगुळा मिळावा आणि महिला सक्षमीकरणाचा आनंद साजरा व्हावा हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. पैठणी जिंकलेल्या महिलांचा आनंद गगनात मावत नव्हता. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विजयी महिलांना पैठणी देण्यात आली. अध्यक्ष पी. टी. पाटील यांनी महिलांना मार्गदर्शन केले. शाळेच्या मुख्याध्यापिका रुपाली भोईर आणि सहकारी शिक्षकांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. विज्ञान दिनानिमित्त आयोजित या विविध उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांबरोबरच पालकांनाही ज्ञान, कौशल्य आणि आनंदाचा अनोखा संगम अनुभवता आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.