नवी मुंबईकरांना सर्वसमावेशक आरोग्य सुविधा द्या
आरोग्यमंत्र्यांकडे पाठपुरावा
वाशी, ता. ३ (बातमीदार) : नवी मुंबई शहरातील नागरिकांना परिपूर्ण व दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, पालिकेच्या रुग्णालयांचे सक्षमीकरण करावे तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध आरोग्य योजनांचा लाभ सर्वसामान्य रुग्णांपर्यंत प्रभावीपणे पोहोचावा, या प्रमुख मागण्यांसाठी ऐरोली येथील शिंदे गटाच्या नगरसेविका वैशाली पाटील यांनी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. या वेळी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख अॅड. रेवेंद्र पाटील उपस्थित होते. चर्चेनंतर मंत्र्यांनी शासनाच्या माध्यमातून आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
निवेदनात नेरूळ येथील माँसाहेब मीनाताई ठाकरे रुग्णालयातील १० खाटांच्या डे-केअर केमोथेरपी युनिटची क्षमता वाढविण्याची मागणी करण्यात आली आहे. ऐरोली येथील राजमाता जिजाऊ रुग्णालयात उपलब्ध जागेत कॅन्सर निदान तपासणी कक्ष व केमोथेरपी सुविधा सुरू करण्याची मागणीही करण्यात आली. तसेच ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वे स्थानकांतील बंद गाळ्यांमध्ये ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू करणे, बहुउद्देशीय इमारतींमध्ये विभाग स्तरावर आरोग्य सुविधा उपलब्ध करणे, कॅन्सर रुग्णांसाठी साप्ताहिक फिरती तपासणी व्हॅन कार्यान्वित करणे आदी मागण्या मांडण्यात आल्या.
वाढते वायू प्रदूषण लक्षात घेऊन धूळ प्रदूषण होणाऱ्या कामांवर तात्पुरती स्थगिती देणे, तसेच खासगी रुग्णालयांत शासन योजनांतर्गत कॅन्सर रुग्णांसाठी मार्गदर्शन कक्ष सुरू करण्याची सूचनाही करण्यात आली. नवी मुंबईतील वाढत्या कॅन्सर रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण गरजेचे असल्याचे वैशाली पाटील यांनी नमूद केले.
चौकट
आरोग्य व्यवस्थापनावर सकारात्मक भूमिका
नवी मुंबईतील वाढत्या कॅन्सर रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पालिका व खासगी रुग्णालयांत उपाययोजना राबविण्याबाबत सविस्तर चर्चा झाली असून, आरोग्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका दर्शविल्याचे वैशाली पाटील यांनी सांगितले.