डोंबिवली-ठाणे प्रवासाचा नवा पर्याय
मोठागाव ते माजिवडा बससेवेला सुरुवात
डोंबिवली, ता. ४ : लोकलमधील जीवघेणी गर्दी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर असताना डोंबिवलीकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. डोंबिवली (पश्चिम) ते ठाणे यादरम्यान थेट बससेवा बुधवारपासून प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते या सेवेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. मात्र, या सोहळ्यात बससेवेपेक्षा चव्हाणांच्या ‘राजकीय गुदगुल्यांनी’ अधिक चर्चा घडवून आणली.
केडीएमसी परिवहन विभागामार्फत ‘स्वामीनारायण सिटी’ ते ‘माजिवडा’ (ठाणे) अशी बससेवा सुरू झाली आहे. भाजप नगरसेवक दीपेश म्हात्रे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यामुळे यश आले आहे. डोंबिवली स्थानकापासून मोठागावपर्यंत रिक्षाने २० रुपये आणि तिथून पुढे माजिवड्यापर्यंत बसने २० रुपये, अशा ४० रुपयांत प्रवाशांना ठाणे गाठता येईल. ही बससेवा रेल्वेवरील ताण कमी करण्यासाठी असली, तरी प्रत्यक्षात मोठागाव आणि स्वामीनारायण सिटी परिसरातील रहिवाशांसाठी ही मोठी सोय मानली जात आहे. मात्र, मार्गातील रेल्वे फाटक आणि वाहतूक कोंडी हे या बसवेळेपुढील मुख्य आव्हान असणार आहे. प्रवाशांचा प्रतिसाद पाहून ही सेवा कायमस्वरूपी सुरू ठेवण्याबाबत निर्णय घेतला जाईल.
राजकीय टोलेबाजी
आम्ही सर्व एकत्र आल्याने बऱ्याच लोकांना गुदगुल्या होणार आहेत, असे विधान करत रवींद्र चव्हाण यांनी विरोधकांना सूचक इशारा दिला, ज्यामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
गाणे शिवसेनेचे, झेंडा भाजपचा!
नुकतेच ठाकरे गटातून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या दीपेश म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी सुरुवातीला कार्यकर्त्यांनी उत्साहात ‘शिवसेनेचे’ गाणे वाजवले. मात्र, म्हात्रे आता भाजपमध्ये असल्याची आठवण कार्यकर्त्यांनी करून दिल्यानंतर तातडीने गाणे बदलून भाजपचे गीत लावण्यात आले. या प्रसंगामुळे कार्यक्रमात काही काळ मजेशीर चर्चा रंगली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.