सुपीक जमिनींवर डल्ला
वाढवणसाठी कवडीमोल किंमत; शेतकऱ्यांमध्ये संताप
निखिल मेस्त्री ः सकाळ वृत्तसेवा
पालघर, ता. ४ ः वाढवण महामार्गासाठी संपादित सुपीक शेतजमिनींना ६२,५०० ते १,२२,००० रुपये प्रति गुंठा मोबदला दिला जाणार आहे, पण बाजारभावानुसार सुपीक जमिनीची किंमत लाखोंमध्ये असताना प्रशासनाने अत्यल्प दर दिल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे.
प्रस्तावित वाढवण हरित महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेला सुरु झाली आहे. डहाणू, पालघर तालुक्यातील २२ गावांतील शेतकरी, बागायतदारांच्या समृद्ध जमिनी संपादित होणार आहेत. मात्र, पालघर-डहाणू तालुक्यातील गावांच्या जमिनीचा दर प्रति हेक्टरी ६२,५०,००० ते १,२२,००,००० रुपये म्हणजे एका गुंठ्याला ६२,५०० ते १,२२,००० रुपयांच्या जवळपास आहे. मोबदल्यापेक्षा शेतीचे वार्षिक उत्पन्न अधिक आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. बाजारभाव, भविष्यातील संभाव्य वाढ, सुपीकतेचा सरसकट दर लागू केले आहेत. त्यामुळे दुजाभाव केल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे.
--------------------------
शेतकऱ्यांचे आक्षेप
- पालघर आणि डहाणू तालुक्यातील ज्या गावांमधील जमिनी प्रस्तावित वाढवण महामार्गासाठी संपादित होत आहेत. भात, भाजीपाला, फळबागा आणि फुलशेतीमुळे शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न होते. महामार्ग प्रकल्पासाठी जमीन संपादित करताना शासनाने केवळ दोन पट दराने मोबदला दिला आहे.
- शेतजमिनीचा प्रति हेक्टरी दर जाहीर केला असला तरी भूसंपादनात हेक्टरच्या प्रमाणात कमी जमिनी संपादन केल्या आहेत. बहुतांश गावांमध्ये लहान क्षेत्रफळ (गुंठ्याच्या प्रमाणात) असलेल्या जमिनी संपादित होत आहेत. प्रकल्पात ज्या लहान मोठ्या जमिनींचे संपादन होणार आहे.
- या एकापेक्षा जास्त कुटुंबांची म्हणजे सातबारावर अनेक खातेदारांची आहे. बाधित जमिनीचा मिळणारा मोबदला मोठा असला तरी एकाच जमिनीचे अनेक खातेदार असल्याने मोबादला रकमेची विभागणी होणार आहे. त्यामुळे वाद, कौटुंबिक कलह, सामाजिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता आहे.
- वाढवण महामार्ग भागातील पूर्व पट्ट्याच्या शेतजमिनी समृद्ध, सिंचनाच्या आहेत, त्यामुळे काही शेतकऱ्यांना दरवर्षी स्थिर उत्पन्न मिळते. भाजीपाला, फुलशेतीमुळे वर्षाकाठी लाखो रुपयांचे उत्पन्न मिळणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एकदाच मिळणारा तुटपुंजा मोबदला भविष्यातील सुरक्षिततेची हमी देत नाही.
------------------------------------
शेतकऱ्यांच्या मागण्या
- बाजारभावाच्या किमान चारपट मोबदला द्यावा.
- सुपीक, बहुपीक जमिनींसाठी स्वतंत्र दर जाहीर करावा.
- मोबदल्यात दुजाभावाची चौकशी करा.
- पुनर्वसन, पर्यायी रोजगाराची हमी द्यावी.
-----------------------------------------
पालघर तालुका
- नेवाळे, राणीशीगाव, सुमडी, गारगाव, चिंचारे, आकेगव्हाण, नानिवली, आंबेदे, आकोली, रावते, शिगव, खुताड तर डहाणू तालुक्यातील धामटणे, कोल्हाण, घोळ, तवा गावातील शेतजमिनीचा दर प्रति हेक्टर ६२ लाख ५० हजार रुपये म्हणजे गुंठ्याला ६२,५०० रुपये.
- वरोर, चिंचणी, तणाशी गांवांसाठी शेतजमिनीचा दर एक कोटी १६ लाख ४४ हजार १०६ रुपये प्रति हेक्टर म्हणजे १,१६,४४१ प्रति गुंठा.
ः- बावडे, कोलवली, वाणगाव या गावांसाठी एक कोटी २२ लाख ४२ हजार ४०८ रुपये प्रति हेक्टर म्हणजेच १,२२,४२४ रुपये प्रति गुंठा.
- बिनशेती जमिनींसाठी गावनिहाय प्रति चौ. मी. ७८० ते २,९४० रुपये दर.
ः--------------------------------
समृद्ध जमिनीना कवडीमोल दर देऊन शेतकरी, आदिवासी, बाधितांची थट्टा सुरू आहे. या दरांपेक्षा कृषी उत्पन्न अधिक आहे. दर आम्हाला अमान्य असून दरवाढीसाठी आंदोलनाची दिशा ठरवली आहे.
- हरेश वावरे, वाढवण प्रकल्पपीडित व बाधित शेतकरी संघर्ष समिती
-------------------------------
दोन पट मोबदला देऊन शासनाने जबाबदारी संपली, असे समजले. परंतु, प्रत्यक्षात शेतीचे वार्षिक उत्पन्न त्यापेक्षा अधिक आहे. त्यामुळे मोबल्यात पारदर्शकता नाही. ही फसवणूक आहे.
- रमेश सावरा, बाधित शेतकरी, नानिवली
----------------------------------
दर निश्चित करताना नियमांचे पालन केले असून, समतोल राखण्याचा प्रयत्न केला आहे. या दराबाबत प्रकल्पग्रस्त असमाधानी असतील, तर त्यांनी लवादाकडे दाद मागण्याचा अधिकार आहे.
- डॉ. इंदुराणी जाखड, जिल्हाधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.