सायबर गुन्हेगारीच्या विळख्यात ठाणे
दोन वर्षांत नागरिकांना १४ अब्जांहून अधिकचा गंडा
पंकज रोडेकर/ सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ४ : ऑनलाइन गुंतवणुकीचे प्रलोभन, डिजिटल अरेस्ट, केवायसी अपडेट, बनावट पार्ट टाईम जॉब आणि शेअर मार्केटच्या प्रलोभनाने ठाणेकर सायबर गुन्हेगारांच्या विळख्यात अडकत आहेत. मागील दोन वर्षांत ठाणे शहर पोलिस आयुक्तालय कार्यक्षेत्रात सायबर फसवणुकीतून नागरिकांचे तब्बल १४ अब्ज रुपयांहून अधिक पैसे भामट्यांनी लुटले आहेत.
पोलिसांच्या अधिकृत आकडेवारीनुसार, मागील दोन वर्षांत सायबर गुन्ह्यांचा आलेख वाढत आहे. मागील दोन वर्षांत साधारणपणे दीड अब्ज रुपयांपेक्षा अधिक रक्कम विविध ऑनलाईन आणि सायबर फसवणुकीतून लुबाडले गेल्याचे समोर आले आहे. २०२५ या वर्षात ६०० हून अधिक आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुन्हा उघडकीस आणण्याचे प्रमाण समाधानकारक असले तरी प्रत्यक्ष गेलेली रक्कम परत मिळवणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. काही प्रकरणांत बँक खात्यांवर तत्काळ ‘होल्ड’ लावून किंवा व्यवहार गोठवून रक्कम वाचविण्यात यश आले. परंतु बहुतेक वेळा पैसे परराज्यातील किंवा परदेशातील खात्यांत वळवले जातात.
गुन्ह्यांची बदलती पद्धत
सायबर गुन्हेगारांकडून सतत नवीन पद्धती वापरल्या जातात. बनावट अॅप आणि वेबसाइटद्वारे गुंतवणुकीचे प्रलोभन, कस्टमर केअर बनून ओटीपी/लिंक शेअर करण्यास भाग पाडणे, समाज माध्यमावरून मैत्री करून भावनिक फसवणूक, पार्ट टाईम जॉबच्या नावाखाली ‘टास्क’ पूर्ण करण्यासाठी पैसे भरण्यास भाग पाडणे या सर्व प्रकारांमध्ये मध्यमवर्गीय, ज्येष्ठ आणि तरुणवर्ग मोठ्या प्रमाणावर बळी पडत असल्याचे दिसते.
जनजागृतीची गरज
पोलिसांकडून वारंवार जनजागृती मोहीम राबविण्यात येत असली तरी ठकबाजी थांबण्याचे नाव घेत नाही. सायबर तक्रारी तत्काळ १९३० या हेल्पलाइनवर नोंदविण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तक्रार जितक्या लवकर नोंदवली जाईल तितकी रक्कम गोठविण्याची शक्यता वाढते, असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने बोलताना सांगितले.
भामट्यांची भामटेगिरी सुरूच
दरवर्षी कोट्यवधी नव्हे तर अब्जावधी रुपयांची उलाढाल करणारे हे सायबर जाळे अधिक संघटित आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम होत असल्याने नागरिकांसाठी धोका वाढत आहे. परिणामी ठाणेकर नागरिकांना सतर्क राहणे आणि कोणतीही आर्थिक व्यवहाराची माहिती अनोळखी व्यक्तींसोबत शेअर न करणे हाच सध्या सर्वात प्रभावी उपाय ठरत आहे.
ठकबाजी (फसवणुकीचा) लेखाजोखा
सन गुन्हे उघड आरोपी टक्के गेलेला माल मिळालेला माल
२०२५ ९८१ ६४६ ६०९ ६६% ८,०९,१९,११,३०६ ४,५६,१७,११५
२०२४ ९०५ ५७४ ४०१ ६३% ६,४८,६०,४१,२२८ ३,०७,२१,४७०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.