एसटीच्या मार्गांवर प्रादेशिक परिवहन विभागाची नजर
अनधिकृत वाहतूक करणाऱ्यांना बसणार चाप
ठाणे शहर, ता. ४ (बातमीदार) : एसटी महामंडळाचे आगार आणि थांब्यांवरील प्रवाशांची पळवापळवी करणाऱ्या खासगी वाहनचालकांना आता चांगलाच दणका दिला जाणार आहे. परिवहनमंत्र्यांच्या आदेशाने ठाणे प्रादेशिक परिवहन विभाग आणि एसटी महामंडळ संयुक्तरीत्या ठिकठिकाणी धाडी टाकून अवैध प्रवासी वाहतुकीवर नजर ठेवणार आहेत. आतापर्यंत चार खासगी बसेसवरदेखील कारवाई करण्यात आली आहे. यामुळे अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
एसटी महामंडळाच्या प्रवाशांची काही ठिकाणी खासगी बस आणि वाहनचालकांकडून वाहतूक केली जाते. हे चालक महामंडळाच्या आगार आणि थांब्यांवर उभ्या असलेल्या प्रवाशांना आपल्या वाहनांमध्ये बसवून त्यांची धोकादायक पद्धतीने वाहतूक करतात. ही बाब परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी प्रादेशिक परिवहन विभागाला अशी वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. यानुसार प्रादेशिक परिवहन विभाग ॲक्शन मोडवर आला असून, विशेष पथकांमार्फत शोधमोहीम सुरू केली आहे. एसटीच्या ठिकाणी परिवहन विभागाचे कर्मचारी नजर ठेवून असून, सतत या मार्गांवर गस्त घातली जात आहे. दंड ठोठावण्यासोबतच नियमांची तत्काळ पूर्तता करण्याच्या सूचनादेखील देण्यात आल्या आहेत. तर परवानगीशिवाय प्रवासी वाहतूक करणाऱ्या चार खाजगी बसेसवरदेखील कारवाई करण्यात आली आहे.
शालेय वाहनांचीही कसून तपासणी
बदलापूर घटनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या मार्गावर प्रादेशिक परिवहन विभागाची पथके तैनात असून, वाहनांची तपासणी केली जात आहे. यामध्ये चालक आणि मदतनीसांचे चारित्र्य दाखले तपासले जात आहेत. अवघ्या दोन दिवसांत १०० हून अधिक स्कूल बस आणि व्हॅन तपासल्या असून, २१ हून अधिक जणांवर कारवाई केली आहे.
नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई
वागळे इस्टेट, घोडबंदर रोड, कोपरी, कळवा, भिवंडी शहर-ग्रामीण आणि शहापूर परिसरात अचानक तपासणी करून बसची कागदपत्रे, फिटनेस, विमा, परवाने, आपत्कालीन बाहेर पडण्याचे दरवाजे, अग्निशामक यंत्रणा, सीसीटीव्ही आणि सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक सुविधा यांची पडताळणी करण्यात येत आहे. सुरक्षितता, अधिकृत प्रवासी वाहतूक व्यवस्था आणि कायद्याची अंमलबजावणी यासाठी ही मोहीम महत्त्वाची आहे. नियम भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पथकांना दिले असल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी सांगितले.
प्रादेशिक परिवहन विभागाकडून नियमबाह्य वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्याचे काम सुरू असते. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक आणि परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या आदेशानंतर आता या कारवाईला अधिक वेग आला आहे. एसटी महामंडळाच्या मार्गांवरील बस थांब्यांवर उभ्या असलेल्या प्रवाशांची खासगी वाहनातून वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. यासाठी राज्य परिवहनचे पर्यवेक्षक आणि आरटीओ अधिकारी संयुक्तपणे कारवाई करीत आहेत.
- हेमांगिनी पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे