बस स्थानकातून प्रवाशांची पळवापळवी
एसटीच्या मार्गांवर प्रादेशिक परिवहन विभागाची नजर
ठाणे शहर, ता. ४ (बातमीदार) : एसटी महामंडळाचे आगार आणि थांब्यांवरील प्रवाशांची पळवापळवी करणाऱ्या खासगी वाहनचालकांना चांगलाच दणका दिला जाणार आहे. परिवहनमंत्र्यांच्या आदेशाने ठाणे प्रादेशिक परिवहन विभाग आणि एसटी महामंडळ संयुक्तरीत्या महिनाभर ठीकठिकाणी धाडी टाकून अवैध प्रवासी वाहतुकीवर नजर ठेवणार आहेत. यासोबतच सदोष स्कूल बस वाहतुकीवरदेखील प्रादेशिक परिवहन विभागाने नजर ठेवून आहे. दरम्यान, अवघ्या दोन दिवसांत विभागाने १०० हून अधिक स्कूल बसची तपासणी करून २१ बसवर कारवाई केली आहे. प्रादेशिक परिवहन विभागाकडून कारवाईचा धडाका सुरू केला असून, यामुळे अवैध प्रवासी आणि शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
बदलापुरातील शालेय बालिकांवर झालेल्या अत्याचाराची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. तसेच एसटी महामंडळाच्या प्रवाशांची काही ठिकाणी खासगी बस आणि वाहनचालकांकडून वाहतूक केली जाते. हे चालक महामंडळाच्या आगार आणि थांब्यांवर उभ्या असलेल्या प्रवाशांना आपल्या वाहनांमध्ये बसवून त्यांची धोकादायक पद्धतीने वाहतूक करतात. ही बाब परिवहनमंत्री प्रताप सरनाईक आणि परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी प्रादेशिक परिवहन विभागाला अशी वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्या निर्देशाअन्वये ठाण्याचा प्रादेशिक परिवहन विभाग सतर्क झाला असून, विशेष पथकांमार्फत सर्च मोहीम सुरू केली आहे. शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या मार्गांवर प्रादेशिक परिवहन विभागाची पदके तैनात केली जात असून, या पथकांकडून शालेय बसची तपासणी केली जात आहे.
तपासणीत शालेय बस आणि व्हॅनचा फिटनेस, इतर सर्व प्रकारची कागदपत्रे, परवाने तपासले जात आहेत. यासोबतच शालेय बस, व्हॅनवर असणाऱ्या चालक आणि मदतनीसांचे चारित्र्य दाखलेदेखील तपासले जात आहेत. परिवहन विभागाने १ मार्चपासून सुरू केलेल्या या कारवाईतून अवघ्या दोन दिवसांत १०० हून अधिक स्कूल बस आणि व्हॅन तपासण्यात आल्या. पैकी २१ हून अधिक जणांवर कारवाई केली आहे. ही कारवाई सुरू असतानाच परिवहन विभागाने एसटी महामंडळाच्या प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांनादेखील कारवाईच्या कक्षेत घेतले आहे. एसटीने ठीकठिकाणी परिवहन विभागाचे कर्मचारी नजर ठेवून असून सतत या मार्गांवर गस्त घातली जात आहे.
वागळे इस्टेट, घोडबंदर रोड, कोपरी, कळवा, भिवंडी शहर-ग्रामीण तसेच शहापूर परिसरात अचानक तपासणी करून बसची कागदपत्रे, फिटनेस, विमा, परवाने, आपत्कालीन बाहेर पडण्याचे दरवाजे, अग्निशामक यंत्रणा, सीसीटीव्ही आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक सुविधा यांची पडताळणी करण्यात येत आहे. तपासणीत दोषी आढळून आलेल्या २१ स्कूल बसवर दंडात्मक कारवाई केली आहे. दंड ठोठावण्यासोबतच नियमांची तत्काळ पूर्तता करण्याच्या सूचनादेखील देण्यात आल्या आहेत. तर परवानगीशिवाय प्रवासी वाहतूक करणाऱ्या चार खासगी बसेसवरदेखील कारवाई करण्यात आली.
विद्यार्थ्यांची सुरक्षितता, अधिकृत प्रवासी वाहतूक व्यवस्था आणि कायद्याची अंमलबजावणी यासाठी ही मोहीम महत्त्वाची आहे. नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पथकांना दिले असल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी सांगितले.
प्रादेशिक परिवहन विभागाकडून नियमबाह्य वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाया करण्याचे काम सुरू असते. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक आणि परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या आदेशानंतर आता या कारवाईला अधिक वेग देण्यात आला आहे. एसटी महामंडळाच्या मार्गांवरील बसथांब्यांवर उभ्या असलेल्या प्रवाशांची खासगी वाहनातून वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. यासाठी राज्य परिवहनचे पर्यवेक्षक आणि आरटीओ अधिकारी संयुक्तपणे कारवाई करीत आहेत.
- हेमांगिनी पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे
शालेय बसची तपासणी
बदलापूरमधील घटनेच्या पार्श्वभूमीवर शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आरटीओने विशेष मोहीम सुरू केली आहे. गेल्या दोन दिवसांत १०० हून अधिक स्कूल बसची तपासणी करण्यात आली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २१ बसवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
काय तपासले जात आहे?
बसचा फिटनेस, विमा आणि कागदपत्रे
आपत्कालीन दरवाजे, अग्निशामक यंत्रणा आणि सीसीटीव्ही
चालक आणि मदतनीसांचे चारित्र्य पडताळणी दाखले
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.