अनधिकृत बांधकामांकडे डोळेझाक
पालिकेच्या ‘अ’ प्रभागाचा कारभार संशयाच्या भोऱ्यात
टिटवाळा, ता. ५ (वार्ताहर) : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या ‘अ’ प्रभाग क्षेत्रात अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट झाला असून, प्रशासनाकडून कारवाईसाठी केवळ ‘चालढकल’ केली जात असल्याचा आरोप होत आहे. टिटवाळ्यातील श्री विनायक आशीष सोसायटीच्या वादानंतर आता वडवली-मोहोने येथील सुधाबाई पांडुरंग तिवारी यांनी अनधिकृत बांधकामांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला असून, प्रशासनाने दखल न घेतल्यास बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वडवली हद्दीतील मौजे मोहोने, शनिवार पाटील नगर येथे ‘जी प्लस वन’ प्रकारचे अनधिकृत बांधकाम उभारण्यात आले आहे. या बांधकामावर २९ एप्रिल २०२५ रोजीच निष्कासनाचे (पाडण्याचे) आदेश देण्यात आले होते. मात्र, अनेक महिने उलटूनही हे बांधकाम ‘जैसे थे’ असल्याने पालिका प्रशासनाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे.
सुधाबाई तिवारी यांनी माहिती अधिकारांतर्गत या बांधकामावर झालेल्या एमआरटीपी कारवाईची आणि गुन्ह्याची माहिती मागवली होती. १८ ऑगस्ट २०२५ रोजी प्रथम अपील दाखल केली होती. त्यानंतर अपीलीय अधिकाऱ्यांनी सहाय्यक आयुक्तांना आठ दिवसांत माहिती देण्याचे आदेश दिले होते; मात्र आठ महिने उलटूनही संपूर्ण माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे. या विलंबामुळे संतापलेल्या तिवारी यांनी अधिकाऱ्यांवर आर्थिक गैरव्यवहाराचा गंभीर आरोप केला आहे. ‘‘प्रशासनाचे आदेश केवळ कागदावरच मर्यादित आहेत, प्रत्यक्षात अनधिकृत बांधकामांना अभय दिले जात आहे,’’ असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. टिटवाळा पूर्व येथील श्री विनायक आशीष अपार्टमेंटच्या रहिवाशांनीही यापूर्वी उपोषणाचे हत्यार उपसले होते. आता सुधाबाई तिवारी यांच्या इशाऱ्यामुळे पालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. प्रशासनाने तातडीने पारदर्शक भूमिका घेऊन कारवाई न केल्यास, या प्रश्नावरून मोठ्या जनआंदोलनाचा भडका उडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
प्रशासकीय अनास्था
‘अ’ प्रभाग क्षेत्रात अनधिकृत बांधकामांच्या तक्रारींचा डोंगर साचला आहे. या प्रकरणावर स्पष्टीकरण मिळवण्यासाठी ‘अ’ प्रभाग क्षेत्र अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त जयवंत चौधरी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळू शकला नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.