उल्हासनगर, ता. ५ (वार्ताहर) : समाजातील वंचित, भटक्या आणि उपेक्षित घटकांसाठी नि:स्वार्थ कार्य करणाऱ्या जिद्दी महिलांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी दिला जाणारा फातिमाबी-सावित्री पुरस्कार यंदा पाच महिलांना जाहीर झाला आहे. शिक्षण, सामाजिक न्याय, पर्यावरण, स्त्रीस्वातंत्र्य आणि ग्रामीण विकास या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या सुनीता भोसले, दीपा पवार, श्वेता सीमा विनोद, आयशा शेख आणि ज्योती तायडे यांची निवड झाली आहे. लोककलावंत कडुबाई खरात यांना विशेष सन्मान पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
समाजपरिवर्तनासाठी कार्य करणाऱ्या महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करणाऱ्या कायद्याने वागा लोकचळवळीच्या प्रतिष्ठित फातिमाबी-सावित्री पुरस्कार २०२६ यंदा पाच प्रेरणादायी महिलांना जाहीर करण्यात आले आहेत. पारधी समाजात जन्म घेऊन अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत बालपण घालवलेल्या आणि आज सुमारे दीडशे मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलणाऱ्या सुनीता भोसले, भटक्या व गुन्हेगारी ठपका लागलेल्या समाजात समानता, न्याय आणि लोकशाहीच्या मूल्यांसाठी सातत्याने काम करणाऱ्या दीपा पवार, उच्च शिक्षण आणि ज्ञानाचा उपयोग करून ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी झटणाऱ्या लढवय्या कार्यकर्त्या व लेखिका श्वेता सीमा विनोद, वैयक्तिक आयुष्यातील संघर्षावर मात करून पर्यावरण आणि शिक्षण क्षेत्रात कार्यरत राहिलेल्या यशस्वी उद्योजिका ज्योती तायडे, तसेच मुस्लिम समाजात स्त्रीस्वातंत्र्याचा संदेश देत बुरख्याच्या बंधनाला नकार देत समाजसुधारणेची चळवळ उभारणाऱ्या आयशा शेख यांची यंदाच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
कायद्याने वागा लोकचळवळीचे प्रणेते राज असरोंडकर यांनी या पुरस्कारांची अधिकृत घोषणा केली आहे. उल्हासनगरातील सिंधुभवन येथे ‘फातिमाबी-सावित्री उत्सव २०२६’ या कार्यक्रमात ज्येष्ठ सिनेनाट्य कलावंत सुषमा देशपांडे यांच्या उपस्थितीत शनिवारी (ता. ७) सायंकाळी पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. सामाजिक कार्यकर्ते पैगंबर शेख यांचीही कार्यक्रमात विशेष उपस्थिती राहणार असून ते ‘माणसं जोडली पाहिजेत’ या सामाजिक चळवळीविषयी आपले विचार मांडणार आहेत. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या ३ जानेवारी जन्मदिनी दरवर्षी हा उत्सव साजरा केला जातो. यंदा निवडणुकांमुळे हा कार्यक्रम मार्चमध्ये घेण्यात आला आहे. या वर्षी उत्सवाचे बारावे वर्ष असल्याची माहिती लोकचळवळीचे माध्यम समन्वयक प्रफुल केदारे यांनी दिली.
विशेष सन्मान पुरस्कार
लोककलेच्या माध्यमातून समाजजागृती करणाऱ्या लोककलावंत कडुबाई खरात यांना यंदाचा विशेष सन्मान पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. कार्यक्रमादरम्यान कडुबाई खरात यांचे जीवनानुभव आणि त्यांचा समृद्ध संगीतप्रवास ऐकण्याची संधी उपस्थितांना मिळणार आहे. संगीतकार आशुतोष वाघमारे आणि कवयित्री वृषाली विनायक त्यांची मुलाखत घेणार आहेत.
उल्हासनगर : समाजपरिवर्तनासाठी कार्य करणाऱ्या पाच महिलांना फातिमाबी-सावित्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.