उल्हासनगर, ता. ५ (वार्ताहर) : नवजात बाळाच्या जन्मानंतर कागदपत्रांच्या फेऱ्यांमध्ये अडकणाऱ्या पालकांची आता मोठी धावपळ थांबणार आहे. उल्हासनगर येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात प्रसूतीनंतर मातेचा घरी सोडताना बाळाचा अधिकृत जन्म दाखला देण्याची सुविधा सुरू केली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मनोहर बनसोडे यांनी ही माहिती देत रुग्णालय प्रशासनाच्या नागरिकाभिमुख निर्णयाची घोषणा केली.
उल्हासनगरच्या शासकीय जिल्हा रुग्णालयातील या उपक्रमामुळे नवमातांसाठी दिलासा मिळाला आहे. आतापर्यंत जन्म दाखला मिळवण्यासाठी पालकांना महापालिका किंवा संबंधित शासकीय कार्यालयात वारंवार जावे लागत होते. आवश्यक कागदपत्रे गोळा करणे, अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे आणि त्यासाठी लागणारा वेळ यामुळे नवमातांना व कुटुंबीयांना मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत होता. मात्र, आता रुग्णालय प्रशासनाने जन्म नोंदणीची प्रक्रिया रुग्णालयातच तत्काळ पूर्ण करण्याची सक्षम व्यवस्था उभी केली आहे. प्रसूतीनंतर बाळाची सर्व माहिती संगणकीय प्रणालीमध्ये नोंदवून अधिकृत जन्म दाखला तयार केला जातो आणि मातेच्या डिस्चार्जवेळी तो थेट पालकांच्या हाती सुपूर्द केला जातो. त्यामुळे वेळ, श्रम आणि पैशांची बचत होत असून नागरिकांचा प्रशासनावर विश्वास अधिक दृढ होत आहे.
बाळाचा जन्म हा प्रत्येक कुटुंबासाठी आयुष्यातील सर्वांत आनंदाचा क्षण असतो. अशा वेळी पालकांना शासकीय प्रक्रियेच्या फेऱ्यांत अडकवणे योग्य नाही, ही आमची भूमिका आहे. त्यामुळेच प्रसूतीनंतर मातेचा डिस्चार्ज होत असतानाच बाळाचा अधिकृत जन्म दाखला देण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमामुळे नवमातांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळून वेळ आणि श्रम वाचतील. शासकीय सेवा अधिक पारदर्शक, जलद आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी रुग्णालय कटिबद्ध आहे.
- मनोहर बनसोडे, जिल्हा शल्य चिकित्सक
प्रसूतीनंतर घरी जाताना बाळाचा जन्म दाखला हातात मिळाल्याने खूप आनंद आणि दिलासा मिळाला. आधी यासाठी वेगवेगळ्या कार्यालयात जावे लागेल, वेळ काढावा लागेल अशी काळजी होती. पण रुग्णालयातच सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्याने आमचा वेळ आणि त्रास दोन्ही वाचले. ही सुविधा सुरू केल्याबद्दल मी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मनोहर बनसोडे यांचे आभार मानते. त्यांच्या पुढाकारामुळे आणि रुग्णालय प्रशासनाच्या तत्परतेमुळे आमच्यासारख्या अनेक मातांना मोठा दिलासा मिळाला आहे.
- वृषाली डावरे, महिला
उल्हासनगर : जिल्हा रुग्णालयात नवमातांना बाळाचा जन्म दाखला देण्याची सुविधा सुरू केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.