कळवा खाडीचे पर्यावरण धोक्यात
सायबानगर-भीमनगर परिसरात अनधिकृत बांधकाम; भूमाफियांची टोळी सक्रिय
किरण घरत : सकाळ वृत्तसेवा
कळवा, ता. ५ : एकेकाळी हिरव्या वनश्रीने नटलेली आणि पक्ष्यांच्या किलबिलाटाने निसर्गसौंदर्याची ओळख असलेली कळवा खाडी सध्या अनधिकृत बांधकामांच्या विळख्यात सापडली आहे. सायबानगर आणि जय भीमनगर परिसरात खाडीकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर झोपड्या उभारण्याचे काम सुरू असून, यामुळे खाडीचे पात्र अरुंद होत चालले आहे. परिणामी येत्या पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.
कळवा परिसरातील काही भूमाफियांकडून प्रभाग क्रमांक २३ मधील शास्त्रीनगर, जानकीनगर, सायबानगर आणि भीमनगर परिसरात गेल्या काही वर्षांपासून अनधिकृत बांधकामांचे प्रमाण वाढत आहे. खाडीकिनाऱ्यालगत डेब्रिज टाकून जागा बुजवली जात असून, त्यावर झोपड्या उभारल्या जात आहेत. त्यामुळे खारफुटीची झाडे नष्ट होत असून, पक्षी व जलचरांची संख्यादेखील कमी होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार सुमारे १५ जणांची भूमाफियांची टोळी या परिसरात सक्रिय आहे. बांधकाम साईटवरील डेब्रिज स्वस्त दरात खरेदी करून ते खाडीकिनारी टाकले जाते आणि त्यावर प्रथम पत्र्याच्या झोपड्या उभारल्या जातात. त्यानंतर सुट्टीच्या दिवशी विटांचे बांधकाम करून त्या झोपड्यांना रंग देऊन लाखो रुपयांना विक्री केली जाते. या कामांसाठी काही ठिकाणी वीज व पाणीजोडणी मिळवून देण्याची व्यवस्थादेखील केली जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
झोपड्यांचे आश्वासन
गेल्या महापालिका निवडणुकीच्या काळात एका राजकीय पक्षाच्या उमेदवाराने या भागातील मतदारांना स्वस्तात घरे देण्याचे आश्वासन दिल्याची चर्चा परिसरात आहे. निवडणूक संपल्यानंतरही काही ठिकाणी झोपड्यांची बांधकामे सुरू असल्याने या प्रकरणाला राजकीय पाठबळ असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.
पूरस्थितीची भीती
खाडीकिनारी उभारलेल्या झोपड्यांमधून टाकला जाणारा कचरा, प्लॅस्टिक आणि इतर घनकचऱ्यामुळे खाडीचे पाणी दूषित होत आहे. त्यामुळे दुर्गंधी वाढली असून डासांचे प्रमाणही वाढले आहे. तसेच डेब्रिज टाकून खाडीचा नैसर्गिक प्रवाह बदलला जात असल्याने पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता अधिक वाढली आहे. खारफुटीची झाडे नष्ट होत असल्याने पक्षी आणि मासे यांचे अधिवासही धोक्यात आले आहेत.
कोळी बांधवांच्या उपजीविकेवर परिणाम
एकेकाळी कळवा खाडीतून स्थानिक मच्छीमार मोठ्या प्रमाणावर मासेमारी करीत असत. मात्र वाढत्या प्रदूषणामुळे आणि खाडीचे पात्र बुजवल्यामुळे मासे खोलवर जाऊ लागले आहेत. परिणामी स्थानिक कोळी बांधवांच्या पारंपरिक व्यवसायावरही संकट ओढवले आहे.
पत्रव्यवहारानंतरही कारवाई नाही
सायबानगर आणि जय भीमनगर परिसरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी स्थानिक नगरसेवकांनी प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला आहे. मात्र अद्याप ठोस कारवाई न झाल्याने भूमाफियांचे धाडस वाढत असल्याची टीका स्थानिकांकडून केली जात आहे.
सरकारी जागेवर अतिक्रमण झाले असल्यास माहिती घेऊन तातडीने कारवाई केली जाईल.
- उमेश पाटील, तहसीलदार, ठाणे
अनधिकृत झोपड्यांबाबत माहिती घेऊन पुन्हा कारवाई करण्यात येईल.
- ललिता जाधव, सहाय्यक आयुक्त, कळवा प्रभाग समिती
कळवा खाडीचे पर्यावरण धोक्यात आले असून, कारवाईसाठी प्रशासनाला वारंवार पत्र दिले आहे.
- मिलिंद पाटील, स्थानिक नगरसेवक
झोपड्यांमधून टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे खाडी दूषित झाली असून डासांचे प्रमाण वाढले आहे.
- शंकर महाडिक, स्थानिक रहिवासी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.