फळ व्यापाराला युद्धाचा फटका
जेएनपीए बंदरात शेकडो कंटेनर अडकले
नवी मुंबई, ता. ५ (वार्ताहर) : इराण आणि इस्राईलमधील वाढत्या तणावामुळे जागतिक व्यापारावर मंदीचे सावट पसरले आहे. याचा परिणाम नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) निर्यातीवरही झाला आहे. रमजानच्या ऐन हंगामात मध्य पूर्वेकडील देशांना पाठवण्यात येणारे फळांचे सुमारे २०० कंटेनर्स जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणात अडकून पडले असल्याने निर्यातदारांचे कोट्यवधींचे नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
मध्य पूर्वेकडील देशात, विशेषतः इराकसाठी रवाना होणारे केळीचे कंटेनर जेएनपीए बंदरात रखडले आहेत. केळी हे नाशवंत फळ असल्याने त्याचा साठा जास्त काळ करता येत नाही. जर हे कंटेनर लवकर रवाना झाले नाहीत, तर ते परत मागवून स्थानिक बाजारात स्वस्त दरात विकण्याशिवाय निर्यातदारांकडे पर्याय उरणार नाही. यामुळे पॅकेजिंग आणि वाहतुकीचा मोठा खर्च वाया जाण्याची शक्यता आहे. केळीसोबत सुमारे एक हजार कांद्याचे कंटेनरही जहाजांच्या प्रतीक्षेत बंदरात उभे आहेत. एकूण उत्पादनाच्या ३० टक्के हापूस आंबा दरवर्षी परदेशात निर्यात केला जातो. मात्र, लांबलेल्या पावसामुळे यंदा उत्पादन कमी झाले असून, युद्धाच्या परिस्थितीमुळे निर्यातीचे मार्ग धोक्यात आले आहेत. द्राक्षे आणि डाळिंबांच्या अनेक खेपाही सुरक्षिततेच्या कारणास्तव रखडल्या आहेत. त्याचप्रमाणे इराणमधून येणारा पिस्ता, बदाम आणि खजुराची आयात लांबल्याने वाहतूक आणि विम्याचा खर्च वाढला आहे. परिणामी, स्थानिक बाजारपेठेत या वस्तूंचे दर वाढण्याची शक्यता आहे. जेएनपीटी बंदरात एकूण पाच हजारांहून अधिक कंटेनर अडकले असून, त्यात एक हजार शीतकरण कंटेनरचा समावेश असल्याचे जेएनपीएच्या प्रतिनिधीकडून सांगण्यात आले आहे. निर्यातदारांना केळीचे कंटेनर परत घ्यावे लागतील, कारण या फळाचे शेल्फ लाइफ कमी असते. यामुळे त्यांना स्थानिक बाजारात कमी किमतीत विक्री करावी लागेल आणि पॅकेजिंग-वाहतुकीचा मोठा तोटा सहन करावा लागेल असे एपीएमसी फळ मार्केटचे संचालक संजय पानसरे यांनी सांगितले.
जेएनपीए प्रशासनाकडून दिलासा
व्यापाऱ्यांची आर्थिक कोंडी टाळण्यासाठी जेएनपीए प्रशासनाकडून बंदरात कंटेनर ठेवण्यासाठी अतिरिक्त जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच, कार्गो हँडलिंग शुल्कावर मर्यादा आणली असून, शीतकरण कंटेनरचा विद्युतपुरवठा खंडित होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.