विमानतळावरील सुरक्षा प्रथम महत्त्वाची
नमाज पठणाची परवानगी नाकारताना उच्च न्यायालयाचे ताशेरे
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : कोणत्याही धर्मापेक्षा विमानतळ आणि तेथील नागरिकांची सुरक्षा महत्त्वाची आहे. त्यासाठी कोणतीही तडजोड करता येणार नाही, असे निरीक्षण गुरुवारी (ता. ५) उच्च न्यायालयाने नोंदवले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाच्या परिसरात रमजाननिमित्त नमाज पठणास परवानगीची मागणी करणारी याचिका न्यायालयाने निकाली काढली.
गतवर्षी एप्रिल महिन्यात तात्पुरत्या स्वरूपात बांधण्यात आलेली शेड तक्रारीवरून एमएमआरडीकडून पाडण्यात आली. त्यानंतर जवळपास वर्षभराने पवित्र रमजान महिना सुरू झाल्यानंतर तुम्ही न्यायालयात कशी धाव घेऊ शकता, असा प्रश्न न्या. बर्गिस कुलाबावाला आणि न्या. फिरदोश पुनीवाला यांच्या खंडपीठाने उपस्थित केला. तसेच अन्य कोणी चुकीचे वागते म्हणून तुम्हीही त्याचे अनुकरण करावे, असा अर्थ होत नाही, असेही न्यायालयाने याचिकाकर्त्यांना सुनावले. मुळात विमानतळावरून सर्व धर्म, जात, संप्रदायाच्या नागरिकांसह महत्त्वाच्या, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचीही विमानतळावर ये-जा असते. जगभरात अशी मागणी कुठेच करण्यात आल्याचे ऐकिवात नाही. विमानतळ, प्रवासी आणि राष्ट्रीय सुरक्षेला महत्त्व दिले जाते. त्यामुळे या सर्व परिस्थितीचा विचार करता नमाज पठणासाठी परवानगी देऊ शकत नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
मुळात, आता रमजान महिना सुरू आहे. तरीही याचिकाकर्त्यांनी नमाज पठण करणे थांबवलेले का? तुम्हाला नमाज पठण करण्यापासून कोणी रोखू शकत नाही; परंतु त्यासाठी तुम्ही एका ठरावीक अथवा विशिष्ट जागेचा वापर करण्याची मागणी करू शकत नाही. उद्या तुम्ही ओव्हल मैदानात पठण करू देण्याची मागणी कराल, ते मान्य करायचे का, असा प्रश्नही न्यायालयाने याचिकाकर्त्यांना केला.
भावनिक नव्हे सुरक्षेच्या दृष्टीने पाहावे
या प्रकरणाकडे धार्मिक, भावनिक दृष्टिकोनातून न पाहता सुरक्षेच्या दृष्टीने पाहावे, अशी भूमिका सरकारच्या वतीने सरकारी वकील ज्योती चव्हाण यांनी मांडली. त्यावर न्यायालय एका जाती-धर्माचा विचार करीत नसून त्या पलीकडे जाऊन सर्वसमावेशक सुरक्षा अधिक महत्त्वाची असल्याचे सरकारच्या युक्तिवादाला समर्थन करताना नमूद केले. विमानतळाजवळच मशिदी आहेत. त्यासोबतच विमानतळावर नूतनीकरणाचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे याचिकाकर्त्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी जागाच नसल्याचेही न्यायालयाने शेवटी नमूद केले. तसेच नूतनीकरणानंतर जर विमानतळ प्रशासन जागा देऊ शकत असल्याचा विचार नक्कीच करावा, असेही शेवटी याचिका निकाली काढताना स्पष्ट केले.
काय प्रकरण?
सुरक्षेच्या कारणास्तव, सध्या सुरू असलेल्या पवित्र रमजान महिन्यातही, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या स्थानिक विमान टर्मिनल परिसरातील तात्पुरत्या शेडमध्ये रिक्षा-टॅक्सी आणि ओला-उबर कॅबचालकांना नमाज पठण करण्याची परवानगी द्यावी, या मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका करण्यात आली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.