बदली होऊन तीन महिने उलटले तरी व्यवस्थापक कल्याण आगारातच
कल्याण, ता. ७ ( वार्ताहर) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ठाणे जिल्ह्यातील कल्याण आगाराचे व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेले महेश भोये यांची पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथे बदली केल्याचे आदेश निघून आता तीन महिने उलटले आहेत. दरम्यान, ते अद्याप कामाच्या ठिकाणी रुजू झाले नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर नक्की कोणाचा वरदहस्त आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
ठाणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे आगार म्हणून कल्याण आगाराकडे पाहिले जाते. सध्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत पुनर्विकासाचे काम येथे सुरू आहे. त्यामुळे काही बससेवा तात्पुरत्या स्वरूपात विठ्ठलवाडी आगारातून किंवा जवळच्या बॅडमिंटन कोर्ट परिसरातून चालविल्या जातात. आगाराचा कारभार विठ्ठलवाडी डेपोतून सुरू असल्याने या ठिकाणचे आगार व्यवस्थापक भोये यांची आणि विठ्ठलवाडी आगाराचे व्यवस्थापक नवज्योत गावडे यांच्यात घनिष्ठ मैत्री झाली. त्यामुळे गावडे यांनी भोये यांच्या वाढदिवसानिमित्त विठ्ठलवाडी डेपोत केक कापून फटाके वाजविले. याच ठिकाणी सीएनजी पंप असून तिथे फटाके फोडल्याने एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. या घटनेची गंभीर दखल घेत परिवहन महामंडळाने गावडे यांची बदली वेंगुर्ला येथे, तर भोये यांची बदली डहाणू येथे करण्याचे निर्देश दिले.
त्यानंतर गावडे यांनी आपला कार्यभार स्वीकारला, मात्र भोये यांना आदेश येऊन तीन महिने उलटले तरी अद्याप त्यांनी नवीन कार्यभार स्वीकारलेला नाही. सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाचे केंद्रीय कार्याध्यक्ष प्रल्हाद सपकाळ यांनी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे प्रवाशांना मिळणाऱ्या अपुऱ्या सोयीसुविधा, राज्य कर्मचाऱ्यांवर होत असलेला अन्याय आणि कल्याण आगारातील भोंगळ कारभार याविषयी लेखी निवेदन दिले आहे.
महामंडळात एका अधिकाऱ्याला तीन वर्षे झाली की त्याची बदली करावी लागते; पण याला कल्याण आगारातील भोये अपवाद आहेत. मागील ११ वर्षांपासून ते कल्याण डेपोमध्ये कार्यरत आहेत. सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक, प्रभारी डेपो मॅनेजर, नियमित डेपो मॅनेजर ही सर्व पदे त्यांनी या ठिकाणी भूषविली आहेत. दरम्यान, भोये बदलीच्या ठिकाणी रुजू का होत नाहीत, अशी चर्चा आगारातील कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.