गुढीपाडवा स्वागत यात्रेत कबड्डीचा जागर
ठाण्यात सामाजिक विषयांवरील चित्ररथांचे आकर्षण
ठाणे, ता. ५ (बातमीदार) : मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी ठाण्यात दरवर्षी काढण्यात येणाऱ्या पारंपरिक गुढीपाडवा स्वागत यात्रेत यंदा भारतीय पारंपरिक खेळ कबड्डीच्या प्रसाराचा विशेष जागर करण्यात येणार आहे. २०३६ मधील ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताचा अधिकाधिक सहभाग व्हावा आणि पारंपरिक भारतीय खेळांना जागतिक स्तरावर मान्यता मिळावी, या उद्देशाने क्रीडा भारतीच्या वतीने जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे प्रतिनिधी मनिष नाखवा यांनी दिली.
गुढीपाडव्याच्या स्वागत यात्रेच्या नियोजनासाठी बुधवारी विविध संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली. ठाण्यातील श्रीकौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्या वतीने २००१ पासून मराठी नववर्षाच्या पहिल्या दिवशी ही यात्रा आयोजित केली जाते. मराठी संस्कृती, परंपरा आणि सामाजिक मूल्यांचा जागर घडविणे हा या यात्रेचा मुख्य उद्देश आहे. यंदा यात्रेचे २६ वे वर्ष असून अधिकाधिक संस्थांचा सहभाग वाढविण्यासाठी सातत्याने बैठका घेऊन नियोजन केले जात आहे. बुधवारी झालेल्या बैठकीत तब्बल ३२ संस्थांनी सहभाग नोंदविला.
समता नगर येथून मुख्य स्वागत यात्रा सुरू होणार असून ज्ञानसाधना महाविद्यालयाचे अध्यक्ष कमलेश प्रधान हे यंदाचे स्वागताध्यक्ष असतील. कळवा, ब्रह्मांड, पोखरण रोड, लोढा अमारा कोलशेत, समता नगर, लोकमान्य नगर आणि ठाणे पूर्व या भागांतून १३ उपयात्रा मुख्य यात्रेत सहभागी होणार आहेत.
चौकट
स्वागत यात्रा आणि कार्यक्रम
यंदाच्या यात्रेत पारंपरिक वेशभूषेतील महिलांची बाईक रॅली हे विशेष आकर्षण असणार आहे. विविध सामाजिक विषयांवर आधारित चित्ररथही यात्रेचे वैशिष्ट्य ठरणार आहेत. लोणावळ्यातील वनशक्ती संस्थेचा प्रदूषणविषयक चित्ररथ, मैत्रीपद संस्थेचा ‘मैत्रीभाव’, समर्थ भारत संस्थेचा ‘संतांची परंपरा’, सनातन संस्थेचा ‘समर्थ ठाणे, सशक्त भारत’ तसेच जीवन विद्या संस्थेचा ‘प्रत्येक कृती राष्ट्रहिताची आणि विश्वशांतीची’ या संकल्पनांवरील चित्ररथ सादर होणार आहेत. आहान फाउंडेशनच्या वतीने सायबर सेफ्टीबाबत जनजागृतीही केली जाणार आहे.याशिवाय छायाचित्र प्रदर्शन, युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीतील १२ किल्ल्यांच्या प्रतिकृतींचा छंद उत्सव, कागदाच्या लगद्यापासून तयार केलेली नाणी तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.