छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानाअंतर्गत कानपोली येथे चावडी बैठक
पनवेल, ता. ७ (बातमीदार) : महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानाअंतर्गत कानपोली येथील राम मंदिर परिसरात ५ मार्च रोजी चावडी बैठक उत्साहात पार पडली. तहसीलदार मीनल भामरे-भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत ग्रामस्थांच्या विविध समस्या जाणून घेऊन त्यावर मार्गदर्शन करण्यात आले.
या बैठकीस नायब तहसीलदार राजश्री जोगी, मंडळ अधिकारी बापू सरगर तसेच तळोजे मंडळातील सर्व ग्राम महसूल अधिकारी उपस्थित होते. याशिवाय कानपोली गावचे सरपंच मदन मते, उपसरपंच रामचंद्र पाटील आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. रात्री सुमारे ८.१५ वाजता सुरू झालेल्या या बैठकीत ग्रामस्थांनी आपापल्या समस्या व अडचणी मांडल्या.
बैठकीदरम्यान महसूल विभागाकडून उपलब्ध असलेल्या विविध सेवांची सविस्तर माहिती देण्यात आली. डिजिटल सातबारा वाटप, विविध प्रकारचे दाखले, ‘जिवंत सातबारा’ मोहिमेअंतर्गत वारस नोंदी, सातबाऱ्यातील दुरुस्ती तसेच निराधार नागरिकांसाठीच्या योजनांचा लाभ यासह महसूल विभागाच्या सुमारे १५ प्रकारच्या सेवांविषयी ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यात आले.
‘चावडी बैठक’ ही पारंपरिक संकल्पना असून ग्रामस्थांच्या सोयीच्या वेळेनुसार ती नव्याने राबविण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. दिवसभर कामधंद्यात व्यस्त असलेल्या नागरिकांना सहभागी होता यावे यासाठी ही सभा रात्री आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे गावातील स्त्री-पुरुष, तरुण आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.
तहसीलदार मीनल भामरे-भोसले यांनी ग्रामस्थांच्या समस्या ऐकून त्या अभियानातील विविध सेवांच्या माध्यमातून कशा सोडवता येतील याबाबत मार्गदर्शन केले. तसेच नागरिकांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.