उन्हाच्या झळांत तहानले पक्षी!
जनताहित फाउंडेशन ट्रस्टकडून पाण्याच्या भांड्यांचे निःशुल्क वितरण
टिटवाळा, ता. ७ (वार्ताहर) : उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असताना कडक उन्हामुळे माणसांप्रमाणेच पक्ष्यांनाही पाण्याची तीव्र टंचाई भासू लागली आहे. वाढते शहरीकरण, झपाट्याने होणारी झाडांची तोड आणि आटत चाललेले पाणवठे यामुळे अनेक पक्ष्यांचे नैसर्गिक अधिवास धोक्यात आले असून चिमण्या, कबुतरे, कावळे, मैना यांसारखे पक्षी पाण्याच्या शोधात उन्हात भटकताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक व पर्यावरण संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या जनताहित फाउंडेशन ट्रस्टने पक्ष्यांसाठी पुढाकार घेत नागरिकांमध्ये जनजागृती सुरू केली असून यंदाच्या उन्हाळ्यात पक्ष्यांसाठी पाण्यासाठी मातीच्या भांड्यांचे (पॉट) निःशुल्क वितरण करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
संस्थेच्या वतीने सांगण्यात आले, की उन्हाळ्यात वाढत्या तापमानामुळे अनेक पक्षी तहानेने त्रस्त होतात. काही वेळा तीव्र उष्णता आणि पाण्याअभावी पक्षी बेशुद्ध पडल्याच्या घटनाही समोर येतात. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने आपल्या घराच्या गच्चीवर, बाल्कनीत, खिडकीत किंवा इमारतीच्या परिसरात पाण्याची भांडी ठेवून पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करावी, असे भावनिक आवाहन संस्थेकडून करण्यात आले आहे. या उपक्रमाद्वारे नागरिकांनी आपल्या परिसरात पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करून पर्यावरण संवर्धनात हातभार लावावा, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.
आजच्या काळात मोठ्या प्रमाणावर झाडांची तोड होत असून निसर्गाचे संतुलन ढासळत चालले आहे. पर्यावरण टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करावे, तसेच दैनंदिन जीवनात प्लॅस्टिकचा वापर टाळून प्लॅस्टिकमुक्त जीवनशैली स्वीकारावी, असेही आवाहन जनताहित फाउंडेशन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.
याबाबत बोलताना ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष रितेश कांबळे म्हणाले, माणूस पाणी मागू शकतो; पण पक्ष्यांचे काय? पक्षी आपली गरज व्यक्त करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्या भावना समजून घेत त्यांच्यासाठी पाण्याची सोय करणे, हे आपले कर्तव्य आहे. आपल्या छोट्याशा प्रयत्नातून अनेक पक्ष्यांचे प्राण वाचू शकतात.
दरम्यान, या उपक्रमांतर्गत पक्ष्यांसाठी पाण्यासाठी मातीची भांडी निःशुल्क उपलब्ध करून देण्यात येत असून नागरिकांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. उन्हाच्या तीव्र झळांत तहानलेल्या पक्ष्यांसाठी पाण्याचे एक भांडे ठेवण्याचा साधा; पण संवेदनशील संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे परिसरात स्वागत होत आहे. तसेच नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचेही संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.