महिला सन्मानासाठी संकल्प इंग्लिश स्कूलची बाईक रॅली उत्साहात
ठाणे, ता. ७ (बातमीदार) : आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून यशोधननगर येथील संकल्प इंग्लिश स्कूलच्या वतीने महिला सन्मान आणि जागृतीसाठी बाईक रॅली काढण्यात आली. शाळेचे संस्थापक, मुख्याध्यापिका, शिक्षक, पालक आणि विद्यार्थिनींच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
यशोधननगर येथील संकल्प इंग्लिश स्कूल येथून सुरू झालेली ही बाईक रॅली उपवन तलावापर्यंत काढण्यात आली. रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सर्वांनी पारंपरिक फेटा बांधून महिला सन्मानाचा संदेश दिला. उपवन तलाव येथे पोहोचल्यानंतर १०० फूट उंच विठ्ठलाच्या मूर्तीसमोर सर्वांनी सामूहिक आरती करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. आरतीच्या थाळ्यांची आकर्षक सजावट हे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.
या वेळी शाळेच्या संस्थापिका डॉ. ज्योती परब, संस्थापक डॉ. राज परब आणि साक्षी परब यांनी महिला दिनाचे महत्त्व सांगत महिलांच्या सन्मानाची जाणीव समाजात रुजवणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमास समाजसेवक माणिक पाटील, कला शिक्षक रवींद्र शिंपी आणि दांडपट्टा असोसिएशनचे अध्यक्ष बाळा साठे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक व कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले.
पारंपरिक युद्धकलेचे प्रात्यक्षिक
शाळेतील शिक्षिका अश्विनी बढे, सारंगा महापुरे आणि कल्पिता शिंदे यांनी भारतीय इतिहासातील वीर महिलांची वेशभूषा साकारून उपस्थितांना प्रेरणादायी संदेश दिला. तसेच दांडपट्टा, लाठीकाठी आणि तलवारबाजी यांसारख्या पारंपरिक युद्धकलेची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. या सादरीकरणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. इयत्ता सहावी ते नववीच्या विद्यार्थिनींनी पारंपरिक वेशभूषेत लेझीम नृत्य सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.