योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून विकासाचा नवा आदर्श
जिल्हा प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ७ : ग्रामीण विकास, स्वच्छता, महिला सक्षमीकरण आणि घरकुल योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून ठाणे जिल्ह्यात प्रशासनाचा वेगळा ठसा उमटवणाऱ्या महिला अधिकाऱ्यांचे कार्य आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. जबाबदारीची जाणीव, कामातील सातत्य आणि लोकाभिमुख दृष्टिकोन यामुळे त्यांनी प्रशासनात परिणामकारक नेतृत्वाचे उदाहरण ठाणे जिल्हा प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे यांनी घालून दिले आहे.
ऑगस्ट २०१८मध्ये छायादेवी शिसोदे यांची कोकण विभागातील ठाणे जिल्हा परिषदेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) म्हणून नियुक्ती झाली. या पदावर कार्यरत असताना त्यांनी ग्रामीण भागातील पाणीपुरवठा व स्वच्छता व्यवस्थेतील अनेक अडथळे दूर केले. अनेक वर्षे रखडलेल्या पाणीपुरवठा योजनांना गती देत त्या मार्गी लावल्या. स्वच्छ भारत अभियानांतर्गत ग्रामीण भागात शौचालय बांधणीची गती वाढवून केवळ सहा महिन्यांत १२ हजार १०६ शौचालयांची उभारणी पूर्ण करण्यात आली. याशिवाय सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाच्या कामांनाही त्यांनी प्राधान्य देत स्वच्छतेच्या चळवळीला प्रभावी दिशा दिली. त्यांच्या कार्यकौशल्याची दखल घेत ९ सप्टेंबर २०२१ला त्यांना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर पदोन्नती देण्यात आली. त्यानंतर जिल्हा परिषद ठाणे येथेच प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि त्या सध्या या पदावर कार्यरत आहेत.
महाआवास अभियानांतर्गत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या प्रभावी अंमलबजावणीत ठाणे जिल्ह्याला राज्यात तिसरा तर कोकण विभागात पहिला क्रमांक मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-२अंतर्गत २०२४-२५ साठी ठाणे जिल्ह्याला मिळालेल्या सात हजार २१६ उद्दिष्टांपैकी १०० टक्के नोंदणी व मंजुरी पूर्ण करणारा ठाणे हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला. प्रधानमंत्री जनजाती आदिवासी महान्याय अभियानांतर्गत आदिवासी आणि कातकरी कुटुंबांना घरकुल मिळवून देण्यासाठीही त्यांनी विशेष प्रयत्न केले. मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमात जिल्हा परिषद ठाणे राज्यात प्रथम क्रमांकावर आली.
लखपती दीदी आणि आर्थिक सक्षमीकरण
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी छायादेवी शिसोदे यांनी विविध उपक्रम राबवले. उमेद अभियानांतर्गत १० हजार ९११ बचत गटांची स्थापना करून सुमारे एक लाख १७ हजार महिलांना या चळवळीत जोडण्यात आले. लखपती दीदी उपक्रमांतर्गत ५२ हजारांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले असून, बचत गटांना सुमारे २१५ कोटी रुपयांचा पतपुरवठा करण्यात आला आहे. नदीतील जलपर्णीपासून उपयुक्त वस्तू तयार करण्यासाठी वीड टू वेल्थ हा अभिनव प्रकल्प राबवून महिलांना हस्तकला वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षणही देण्यात आले.
पारदर्शक प्रशासनाचा आदर्श
मार्च ते जून २०२४ या कालावधीत त्यांच्याकडे जिल्हा परिषद, ठाणेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभारही होता. या काळात जिल्ह्यातील पाणीटंचाईचे प्रभावी व्यवस्थापन करण्यात आले. विशेष म्हणजे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रिया सोशल मीडियावर थेट प्रक्षेपित करून प्रशासनातील पारदर्शकतेचा नवा आदर्श निर्माण केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.