धोकादायक कंपन्यांच्या तपासणीचे आदेश
भगेरिया कंपनीतील वायू गळतीनंतर प्रशासनाची कारवाई
पालघर, ता. ७ ः तारापूर एमआयडीसीमधील एका उत्पादक कंपनीतील वायू गळतीमुळे परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले होते. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पुढील धोका टाळण्यासाठी धोकादायक कंपन्यांच्या तपासणीचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी आज औद्योगिक सुरक्षा संचालनालय आणि संबंधित यंत्रणांना दिले आहेत.
भगेरिया (पूर्वीची झेनिथ) या रासायनिक उत्पादन कंपनीमध्ये ओलियम वायू गळतीमुळे गावात प्रचंड भीती निर्माण झाली होती. ओलियमचा वापर करून भगेरिया इंडस्ट्रीजमध्ये एच-ॲसिड उत्पादन करण्याची युनिट बंद करण्याच्या सूचना प्रदूषण नियंत्रण मंडळाने संबंधित कंपनी व्यवस्थापनाला घडलेल्या घटनेनंतर दिले आहेत. तर वायू गळतीच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आवश्यक उपाययोजनांची अंमलबजावणी करून औद्योगिक सुरक्षा विभागाकडून त्याचे प्रमाणीकरण केल्यानंतरच उत्पादन पुन्हा सुरू करण्याची परवानगी देणार असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तारापूर कार्यालयाकडून सांगण्यात आले.
.........
घातक उद्योगांचे सर्वेक्षण
तारापूरमधील धोकादायक आणि संभाव्य घटना घडण्याची शक्यता असलेल्या घातक उद्योगांचे सर्वेक्षण करून उत्पादन प्रक्रियेतील तसेच रासायनिक हाताळणीसंदर्भात असणाऱ्या त्रुटींचा अभ्यास करणे व प्रतिबंधात्मक उपाययोजना आखण्याबाबतचे हे निर्देश आहेत. सर्वेक्षण केल्यानंतरचा अहवाल महिनाभरात सादर करण्याचे आदेश दिल्याचे जिल्हाधिकारी जाखड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य विभागाकडे पालघर जिल्ह्यात मर्यादित मनुष्यबळ असून, विशेष सर्वेक्षण करण्यासाठी राज्यभरातून १४ अधिकारी हंगामी पद्धतीने विशेष सर्वेक्षण करीत असल्याची माहिती या विभागाकडून देण्यात आली.
घटना कशी घडली?
रोजच्या वापरासाठी असणाऱ्या ओलियमच्या टाक्यांचा लोखंडी आधार गंजून कमकुवत झाला होता. दरम्यान, हा आधार निखळल्याने ओलियमच्या टाक्या कलंडल्या. यामुळे टाकीचे पातळी दर्शविणारे उपकरण आणि टाकीचे नोझल तुटल्याने त्यामधून ओलियमची गळती सुरू झाली. अपघात घडला त्या वेळी दोन टाक्यांमध्ये १,२०० लिटर ओलियम असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ओलियम हवेच्या संपर्कात आल्यानंतर कंपनीसह एक किमी परिसरात वायूचे लोट पसरले. त्यामुळे भीतीसदृश वातावरण निर्माण होऊन सर्वत्र पळापळ झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.