सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ७ : ठाणेकरांच्या सुखद प्रवासासाठी ठाणे पालिकेचा परिवहन विभाग सरसावला आहे. परिवहन सेवेच्या ताफ्यात पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक बस आणत प्रवाशांना जास्तीत जास्त सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशातच परिवहनच्या ताफ्यात पीएमई, १५ वित्त आयोग आणि सीएनजी अशा पर्यावरणपूरक ३६० बस दाखल होणार आहे. दुसरीकडे १५ वर्षांहून अधिक काळ झालेल्या जुन्या १७ डिझेल बसच्या विक्रीला काढण्याच्या तयारीत आहेत. या बसचा ऑनलाइन लिलाव नवीन आर्थिक वर्षात केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे शहराची लोकसंख्या २२ लाखांच्या पुढे गेली असली, तरी सार्वजनिक वाहतुकीसाठी बसची संख्या तुलनेने अपुरी आहे. अनेकांना खासगी बस किंवा रिक्षांवर अवलंबून राहावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर परिवहन प्रशासनाने ताफा मजबूत करण्यासाठी काही पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्याअंतर्गत इलेक्ट्रिक बसचा समावेशही करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा उपक्रमांतर्गत ई-बस टप्याटप्याने खरेदी करण्यात येत आहे. यापूर्वी या उपक्रमांतर्गत १२३ ई-बस खरेदी केल्या आहेत. यात १२ आणि ९ मीटर लांबीच्या बसचा समावेश आहे.
यंदाच्या नवीन आर्थिक वर्षात पीएमईअंतर्गत १०० ई-बससह १५ वित्त आयोगांतर्गत १६० आणि पालिका परिवहन विभाग १०० सीएनजी सध्या बस घेण्याच्या तयारीत आहेत. अशा ३६० बस मार्च २०२७ अखेरपर्यंत परिवहनच्या ताफ्यात दाखल होतील, असा विश्वास परिवहन विभागाने व्यक्त केला आहे. या बस परिवहनच्या ताफ्यात दाखल झाल्यानंतर ठाणेकरांचा प्रवास अधिक सुखद व गारेगार होणार आहे.
लिलाव प्रक्रियेतून लाखोंचे उत्पन्न
ठाणे परिवहन सेवेकडील भंगारात पडून असलेल्या ३३ बसचा ऑनलाइन लिलाव करण्यात आला होता. कळवा आणि वागळे आगारातील या बसच्या लिलाव प्रक्रियेत दिल्ली, मुंबई, हैदराबाद आणि बंगळूरू येथील व्यापाऱ्यांनी सहभाग घेतला होता. या लिलावातून परिवहन सेवेला सुमारे ८७ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. या निधीतून जुन्या बससाठी लागणारे स्पेअर पार्ट खरेदी करून काही बस पुन्हा दुरुस्त केल्या होत्या. त्यातच आता नवीन आर्थिक वर्षात १७ बसच्या लिलावाची प्रक्रिया राबविण्याचा परिवहन प्रशासनाचा मानस असल्याची माहिती ठाणे परिवहन सेवेचे व्यवस्थापक भालचंद्र बेहेरे यांनी दिली. आवश्यक शासकीय परवानग्या मिळाल्यानंतर ही प्रक्रिया सुरू केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.