ठाण्याचे १० विद्यार्थी ‘यूपीएससी’त चमकले
पालिकेच्या चिंतामणराव देशमुख संस्थेची भरारी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ७ : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षेत ठाण्यातील १० विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. ठाणे महापालिका संचालित कै. चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण घेणाऱ्या या विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवून ठाणे शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या संस्थेतून यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या आता १००च्या पार गेली आहे.
दीपाली महतो (क्रमांक ३६), अंकिता पाटील (क्रमांक १४०), अभिषेक मगदूम (क्रमांक ४४९), धनंजय दिघे (क्रमांक ५२९), पारस मेस्त्री (क्रमांक ५५५), आविष्कार डेर्ले (क्रमांक ५९१), सिद्धार्थ तगड (क्रमांक ६१९), शिवम वखारे (क्रमांक ६५१), मनीष झेंडे (क्रमांक ७८८), प्रणव बेंढारी (क्रमांक ९२६) अशी या यशस्वी विद्यार्थ्यांची नावे असून ही परीक्षा उत्तीर्ण केल्यामुळे त्यांना प्रशासकीय सेवेचा मार्ग मोकळा झाला आहे.
यशाची परंपरा कायम
ठाणे महापालिका संचालित कै. चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण ही संस्था यूपीएससी व एमपीएससी स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन देणारी राज्यातील एक महत्त्वाची संस्था आहे. येथून आतापर्यंत १०२ विद्यार्थ्यांनी यश मिळवून शासनाच्या विविध सेवांमध्ये उच्च पदांवर मजल मारली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे महापौर शर्मिला पिंपोळकर आणि महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी विशेष अभिनंदन केले आहे.
मराठी टक्का वाढवण्यावर भर
प्रशासकीय सेवेत महाराष्ट्रातील मराठी विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा, यासाठी ही संस्था सातत्याने प्रयत्नशील आहे. संस्थेत सुमारे १४० विद्यार्थ्यांची बॅच असून त्यांना दरमहा तीन हजार रुपये विद्यावेतन (स्टायपेंड), वसतिगृह आणि सर्वांगीण मार्गदर्शन दिले जाते. देशातील महापालिकांमध्ये असे दर्जेदार प्रशिक्षण देणारी ठाणे महापालिका ही अग्रणी संस्था आहे, असे संस्थेचे संचालक महादेव जगताप यांनी नमूद केले.
देशसेवेचा मानस
कठोर परिश्रम, योग्य नियोजन आणि संस्थेच्या मार्गदर्शनामुळेच हे यश मिळाल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. भविष्यात आयएएस, आयपीएस, आयआरएस तसेच इतर केंद्रीय सेवांमध्ये रुजू होऊन देशसेवा करण्याचा मानस या गुणवंतांकडून व्यक्त करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.