‘सुपर स्वच्छ लीग’मध्ये स्थान टिकवण्यासाठी पालिकेने कंबर कसली
स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ साठी नवी मुंबई महापालिकेची व्यापक तयारी सुरू
वाशी, ता. ८ (बातमीदार) : देशातील स्वच्छ शहरांमध्ये सातत्याने अव्वल स्थान मिळवणाऱ्या नवी मुंबईने ‘सुपर स्वच्छ लीग’मधील आपले मानांकित स्थान कायम राखण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६’च्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिकेने नियोजनबद्ध उपक्रमांची अंमलबजावणी सुरू केली असून, शहरातील स्वच्छतेच्या विविध घटकांवर विशेष लक्ष केंद्रित केले जात आहे.
महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच विशेष आढावा बैठक पार पडली. या बैठकीत अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी स्वच्छ सर्वेक्षणासंदर्भातील विविध बाबींचे सविस्तर सादरीकरण केले. या वेळी शहर अभियंता शिरीष आरदवाड, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे, परिमंडळ १चे उपआयुक्त सोमनाथ पोटरे, अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशनअंतर्गत यंदाच्या सर्वेक्षणात एकूण १२,५०० गुणांचे मूल्यांकन केले जाणार आहे. त्यामध्ये प्रत्यक्ष स्वच्छता पाहणी, नागरिकांचा प्रतिसाद, तक्रार निवारण व्यवस्था यांना विशेष महत्त्व देण्यात आले आहे. शहरातील बाजारपेठा, वर्दळीची ठिकाणे, झोपडपट्ट्या, गावठाण भाग, सार्वजनिक व सामुदायिक शौचालये, जलाशय, नाले, गटारे, कचरा निर्मिती करणाऱ्या सोसायट्या तसेच उद्यानांची स्वच्छता आणि सुविधा यावर विशेष लक्ष देण्यात येणार आहे. तसेच कचऱ्यापासून नवनिर्मिती, वायू प्रदूषण नियंत्रण, बांधकाम कचऱ्याची विल्हेवाट आणि भिंतींवरील चित्रांकनाद्वारे सुशोभीकरण अशा उपक्रमांनाही चालना देण्यात येणार आहे.
स्वच्छतेबाबत जनजागृती वाढवण्यासाठी स्वच्छता ॲप आणि सिटीझन फीडबॅक मोहिमेद्वारे नागरिकांचा सहभाग वाढवण्यावरही भर देण्यात येणार आहे.
चौकट
स्वच्छ शहर जोडी उपक्रमाला चालना
‘स्वच्छ शहर जोडी’ या संकल्पनेअंतर्गत नवी मुंबई महापालिकेसोबत लोणार, मलकापूर नगर परिषद तसेच केज, कन्नड आणि जिंतूर नगरपंचायतींना मार्गदर्शन केले जात आहे. यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी संबंधित शहरांना भेट देऊन स्वच्छतेची पाहणी केली असून, आवश्यक सुधारणा सुचविल्या आहेत. तसेच या शहरांसाठी दोनदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्याचाही विचार सुरू आहे. ‘सुपर स्वच्छ लीग’मधील स्थान अधिक बळकट करण्यासाठी प्रशासनासोबत नागरिकांनीही स्वच्छता उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.