डोंबिवलीत लेझीम खेळाचा जागतिक विक्रम
नऊ हजार १११ महिलांचा सहभाग; सांगलीचा विक्रम मोडीत
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ८ : जागतिक महिला दिनानिमित्त डोंबिवलीत तब्बल नऊ हजार १११ महिलांसह विद्यार्थिनींनी एकत्र येत सामूहिक लेझीम खेळून जागतिक विक्रम प्रस्थापित केला. यामुळे सांगलीच्या नावावर असलेला सात हजार ३३८ महिलांच्या सहभागाचा विक्रम मोडत डोंबिवलीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला.
भाजप प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांच्या ‘डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार’ आणि कल्याण तालुका शारीरिक शिक्षण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (ता. ८) डोंबिवलीतील श्री संत सावळाराम क्रीडा संकुल येथे या सामूहिक लेझीम खेळाचे आयोजन करण्यात आले होते. ठाणे जिल्ह्यातील विविध शाळांतील विद्यार्थिनी आणि महिला मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी झाल्या होत्या. सुमारे साडेपाच मिनिटे विविध प्रात्यक्षिके सादर करीत नऊ हजार १११ महिलांनी एकाच वेळी लेझीम खेळले आणि जागतिक विक्रम नोंदवला. यापूर्वी सांगली येथे सात हजार ३३८ महिलांनी एकत्र येऊन हा विक्रम केला होता. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे लंडनहून आलेले अधिकारी स्वप्नील डांगरेकर यांनी डोंबिवलीत हा नवा विक्रम प्रस्थापित झाल्याची घोषणा केली. या वेळी डांगरेकर यांनी आमदार रवींद्र चव्हाण यांच्या पत्नी सुहासिनी चव्हाण यांच्याकडे वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र व पदक सुपूर्द केले.
..
संस्कृतीचा महत्त्वाचा भाग
लेझीम खेळ हा आपल्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग असून तो जपण्याचे काम सर्वांनी करावे, असे आवाहन आमदार रवींद्र चव्हाण यांनी या वेळी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शारीरिक तंदुरुस्तीवर भर देण्याचे आवाहन केले असून, त्याच प्रेरणेने महिलांनी व विद्यार्थिनींनी एकत्र येत हा अनोखा विक्रम घडवला, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमावेळी ‘भारत माता की जय’, ‘जय श्री राम’, ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. ढोल-ताशांच्या गजरात उपस्थितांनी विक्रमाचा जल्लोषात आनंद साजरा केला. पहाटेपासूनच या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. विक्रमाची घोषणा होताच उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.