नवी मुंबईत महिला दिन उत्साहात
वाशी, ता.८ (बातमीदार) : जागतिक महिला दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विविध सांस्कृतिक उपक्रम, सन्मान सोहळे आणि स्पर्धांमुळे हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या वेळी महापौर सुजाता पाटील यांनी महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देत “महिलांनी मोठी स्वप्ने पाहावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत. समोर येणाऱ्या अडचणींचे संधीत रूपांतर करण्याची ताकद महिलांमध्ये आहे,” असे सांगितले. महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. विशेषतः एनएमएमटी परिवहन सेवेत महिला चालक तयार करण्यासाठी प्रशिक्षण देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाला आमदार मंदा म्हात्रे, उपमहापौर दशरथ भगत, स्थायी समिती सभापती अशोक पाटील, सभागृह नेते सागर नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी महिला उद्योजिका मंदा भिवसेन उंडे यांना महिला उद्योजकता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच नूतन सहकारी सेवा संस्था, कोपरखैरणे यांना स्वच्छता अभियानातील उत्कृष्ट कार्याबद्दल गौरविण्यात आले. आठ प्रशासकीय विभागांतील आशा सेविका व महिला स्वच्छताकर्मींचाही विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात समूहगायन, भजन, मंगळागौर, समूह नृत्य, नाटिका व शॉर्ट व्हिडिओ स्पर्धांचे पारितोषिक वितरण करण्यात आले. तसेच विशेष पैठणी ड्रॉमधील विजेत्या महिलांना मानाची पैठणी देऊन गौरविण्यात आले. महिला बचत गटांच्या वस्तूंचे स्टॉल्सही लावण्यात आले होते.
चौकट
महिलांच्या सबलीकरणावर भर
महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी त्यांना प्रशिक्षण, रोजगाराच्या संधी आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार असल्याचे महापौरांनी सांगितले. महिला बचत गट आणि उद्योजिकांना प्रोत्साहन देण्यासाठी महानगरपालिकेच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.