अंधेरी पूर्वेत नगरदास रोडवरील गटाराचे झाकण तुटले
चार दिवसांपासून पालिकेचे दुर्लक्ष, अपघाताचा धोका
जोगेश्वरी, ता. ९ (बातमीदार) : अंधेरी पूर्व येथील नगरदास रोडवर श्री गोवर्धनदासची हवेली असलेल्या जैन मंदिराजवळ रस्त्याच्या मधोमध असलेल्या भल्यामोठ्या भूमिगत गटाराचे झाकण तुटून आत पडल्याने वाहनचालकांसाठी मोठा धोका निर्माण झाला आहे. गेल्या चार दिवसांपासून हे झाकण तुटलेल्या अवस्थेतच असून, अद्याप त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही.
या धोकादायक ठिकाणी अपघात टाळण्यासाठी स्थानिक नागरिकांनी तात्पुरती उपाययोजना करीत लोखंडी बॅरिकेड लावले असून, त्याखाली वाळूने भरलेल्या गोणी ठेवून जागा अडवली आहे. मात्र हा मार्ग अंधेरीकडे जाणारा मुख्य रस्ता असल्याने येथे दिवसभर मोठी वाहतूक सुरू असते. या रस्त्यावरून शाळेच्या बस, रिक्षा तसेच मालवाहू टेम्पोंची दिवसरात्र ये-जा सुरू असते.
याशिवाय पुढील भागात रस्त्याचे काम सुरू असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. मात्र वाहतूक कोंडीचे नियमन करण्यासाठी येथे कोणत्याही वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्यात आलेली नसल्याचे दिसून येत आहे.
विशेष म्हणजे या ठिकाणापासून काही अंतरावरच महापालिकेचे के-पूर्व विभागाचे कार्यालय असूनही या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याने स्थानिक नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत. संबंधित विभागाने तत्काळ दखल घेऊन तुटलेले झाकण दुरुस्त करावे आणि वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.