शौचालयांना प्लायवूडचा आधार
ठाण्यात महिलांची कुचंबणा; ज्ञानेश्वरनगरमधील दुरवस्था
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ७ : जागतिक महिला दिनानिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण असताना हायटेक प्रकल्प राबवणाऱ्या ठाण्यात शौचालयाच्या दुरवस्थेमुळे महिलांची कुचंबणा होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ठाणे महापालिका मुख्यालयापासून जवळ असलेल्या ज्ञानेश्वरनगरमधील सार्वजनिक शौचालयांचे दरवाजे सडले असून, पोटात भीती आणि हातात प्लायवूडचा तुकडा घेऊन महिलांना शौचास जावे लागत आहे. सहा महिन्यांपासून याविषयी तक्रारी दाखल केल्यानंतरही कोणतीच दखल घेतली जात नसल्याने ठाकरे गटाचे नगरसेवक शहाजी खुस्पे यांनी हे दरवाजे स्वखर्चातून लावणार असल्याचे सांगितले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी झोपडपट्टी भागातील नागरिकांचे आयुष्य निरोगी वातावरणात जगता यावे, यासाठी त्या ठिकाणी असलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या स्वच्छतेवर भर देण्याचे पालिका प्रशासनाला निर्देश दिले होते. तसेच नादुरुस्त शौचालयांच्या दुरुस्तीसाठीदेखील एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना, कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. असे असतानादेखील शहरातील प्रभाग क्रमांक ११ मधील ज्ञानेश्वरनगरमधील महिला व पुरुष सार्वजनिक शौचालयाची दुरवस्थ झाली असल्याचे समोर आले आहे. या प्रभागाचे ठाकरे गटाचे नगरसेवक शहाजी खुस्पे यांनी या शौचालयाच्या दुरवस्थेसह येथे ना पाणी, ना वीज याबाबत पालिका प्रशासनाकडे मागील सहा महिन्यांपासून पाठपुरवा केला. मात्र पालिका प्रशासनाकडून आश्वासनाव्यतिरिक्त कोणतीच कार्यवाही या ठिकाणी केली नसल्याचा आरोप खुस्पे यांनी केला. या ठिकाणी काळोख असल्याने मद्यपी व नशेखोरी करणाऱ्या व्यक्तींचा वावर अधिक असतो. यामुळे संध्याकाळच्या वेळी शौचालयास जाणाऱ्या महिलांमध्ये भीती असते. त्यामुळे पालिका प्रशासनाने या शौचालयाच्या दुरवस्थेवर तत्काळ उपाययोजना आणि दुरुस्ती न केल्यास स्वखर्चाने दरवाजे बसविणार असल्याचे सांगितले.
माझा राग जनतेवर काढू नका!
प्रभाग क्रमांक ११मध्ये तीन शिवसेनेचे आणि ठाकरे पक्षाचा एकमेव नगरसेवक म्हणून मी निवडून आलो आहे. माझ्या प्रभागातील ज्ञानेश्वरनगर येथील शौचालये तसेच नाल्यांच्या स्वच्छतेबाबत वारंवार तक्रारी आणि पत्रव्यवहार करूनदेखील ठोस कारवाई होत नाही. त्यामुळे याबाबत पालिका प्रशासनाची भूमिकादेखील संशयास्पद आहेत. ते ठेकेदारांच्या तालावर नाचत असल्याचा आरोपदेखील खुस्पे यांनी केला. तसेच माझ्यावरचा राग जनतेवर काढू नका, असा इशारादेखील त्यांनी दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.