शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढला
औषध फवारणीचा अभाव, बांधकामस्थळी साचलेल्या पाण्यामुळे डासांची पैदास; नागरिक हैराण
तुर्भे, ता. ९ (बातमीदार) : शहरात गेल्या काही दिवसांपासून डासांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. घरांच्या परिसरात, सोसायट्यांमध्ये तसेच रस्त्यांलगत डोळ्यासमोर डास फिरताना दिसत असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. नियमित धुरीकरण आणि औषध फवारणी होत नसल्यामुळेच डासांचा प्रादुर्भाव वाढल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
शहरातील विविध भागांत सध्या इमारतींची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. अनेक बांधकामस्थळी पाणी साचून राहत असल्याने ते डासांच्या उत्पत्तीचे केंद्र बनत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे महापालिकेने अशा ठिकाणी विशेष तपासणी करून साचलेले पाणी तातडीने हटवावे आणि आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणीही नागरिकांकडून केली जात आहे.
पालिका हद्दीतील गावठाण भागात सांडपाणी वाहून नेणारी यंत्रणा सक्षम नसल्याने अनेक ठिकाणी उघडी गटारे आणि घाणीचे साम्राज्य कायम आहे. सुका आणि ओला कचरा वर्गीकरणाची संकल्पना येथे प्रभावीपणे राबवली जात नसल्याने अनेक भागांत कचऱ्याचे ढीग साचलेले दिसून येतात. या परिस्थितीमुळे डासांच्या उत्पत्तीला पोषक वातावरण निर्माण होत असल्याचे नागरिक सांगत आहेत.
यापूर्वी डासांचा त्रास मुख्यतः गावठाण भागात अधिक जाणवत होता. मात्र आता शहरी भागातील सोसायट्यांमध्येही डासांचा उपद्रव वाढू लागला आहे. संध्याकाळी गॅलरीत उभे राहणे किंवा मोकळ्या हवेत फेरफटका मारणेही अवघड झाले असून, डासांच्या चाव्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
डासांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून डास अळी नाशक फवारणी आणि धुरीकरण मोहीम राबवली जाते. मात्र सध्या ही मोहीम प्रभावीपणे राबवली जात नसल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. काही भागांत धुरीकरण नियमित होत नसल्याने तसेच औषध फवारणीचा दर्जा सुमार असल्याने डासांवर नियंत्रण राहत नसल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, वाढत्या डासांमुळे ताप, व्हायरल इन्फेक्शन आणि इतर आजारांचे प्रमाणही वाढू लागल्याचे डॉक्टरांकडून सांगितले जात आहे. पालिका तसेच खासगी रुग्णालयांमध्ये अशा रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. त्यामुळे शहरात तातडीने व्यापक धुरीकरण मोहीम राबवून औषध फवारणी वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
चौकट
आरोग्य विभागाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी
डासांचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरात व्यापक पातळीवर धुरीकरण मोहीम राबवण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे. बांधकामस्थळी साचलेले पाणी हटवणे, उघड्या गटारांची स्वच्छता करणे, कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणे आणि अडगळीच्या जागांची नियमित सफाई करणे गरजेचे आहे. तसेच डास अळी नाशक औषध फवारणी अधिक प्रभावीपणे करून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गांभीर्याने हाताळावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.