पान ४ करिता
..................
‘कल्की....’साठी कमल हसनला ५० कोटी मानधन?
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते कमल हसन ‘कल्की २८९८ एडी’ या बहुचर्चित चित्रपटामुळे पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या कमल हसन यांनी या प्रकल्पासाठी सुमारे ५० कोटी रुपये मानधन घेतल्याची माहिती समोर आली आहे. दिग्दर्शक नाग अश्विन यांच्या दिग्दर्शनाखाली साकारत असलेल्या या चित्रपटाची कथा मोठ्या कॅनव्हासवर मांडली जात असल्याने तो दोन भागांत प्रदर्शित करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला. या दोन्ही भागांसाठी मिळून कमल यांनी ५० कोटी रुपये मानधन घेतल्याचे सांगितले जात आहे. चित्रपटातील त्यांच्या भूमिकेचा मोठा भाग पुढील भागात दिसणार असल्याचेही बोलले जात आहे. पहिल्या भागासाठी कमल यांनी अवघ्या काही दिवसांत चित्रीकरण पूर्ण केले होते. त्यानंतर आता ते ‘कल्की २८९८ एडी’च्या पुढील भागाच्या चित्रीकरणासाठी पुन्हा सेटवर परतले आहेत. दरम्यान, या चित्रपटासाठी कमल हसन यांनी तब्बल १५० कोटी रुपये मानधन घेतल्याच्या चर्चा काही ठिकाणी रंगल्या होत्या. मात्र, त्या वृत्तांमध्ये तथ्य नसल्याचे समोर आले असून, त्यांच्या मानधनाबाबत ५० कोटींचीच रक्कम निश्चित झाल्याचे सांगितले जात आहे. मोठ्या बजेटचा आणि बहुभाषिक प्रेक्षकवर्गाला लक्षात घेऊन तयार होणारा ‘कल्की २८९८ एडी’ हा चित्रपट सध्या प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. कमल हसन यांची भूमिका आणि चित्रपटाचा पुढील भाग याबाबतही चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढताना दिसत आहे.
.......
भारती सिंगला एआयचा फटका!
कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानामुळे अनेक क्षेत्रांमध्ये मोठे बदल घडत असताना त्याच्या गैरवापराच्या घटनाही वाढताना दिसत आहेत. अलीकडेच प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंगच्या नावाचा आणि आवाजाचा वापर करून बनावट जाहिरात केल्याचा प्रकार समोर आला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये भारती वजन कमी करण्यासाठी एका उत्पादनाचा सल्ला देताना दिसत असल्याचे दाखवण्यात आले आहे. मात्र, हा व्हिडिओ एआय तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तयार करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये तिचा चेहरा आणि आवाज हुबेहूब तयार केल्यामुळे अनेकांना तो खरा असल्याचा भास झाला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर भारतीने स्वतः सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत या जाहिरातीपासून आपला कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. काही दिवसांपासून लोकांकडून संदेश येत असून, या उत्पादनामुळे खरोखर वजन कमी होते का, असा प्रश्न विचारला जात असल्याचे तिने सांगितले. तिने पुढे सांगितले की, या उत्पादनाशी किंवा संबंधित कंपनीशी तिचा कोणताही संबंध नाही. एआयच्या मदतीने तिचा आवाज तयार करून लोकांची दिशाभूल केली जात आहे. विशेष म्हणजे या जाहिरातीमुळे तिच्या कुटुंबीयांनाही संभ्रम निर्माण झाला होता. तिच्या आईनेही या उत्पादनाबद्दल चौकशी केल्याचे तिने सांगितले. सोशल मीडियावरील अशा प्रकारच्या जाहिराती किंवा व्हिडिओंबाबत खातरजमा करूनच विश्वास ठेवावा, असे आवाहन भारती सिंगने चाहत्यांना केले आहे.
.......
‘है जवानी तो इश्क होना है’ची प्रदर्शन तारीख बदलली!
वरुण धवन, पूजा हेगडे आणि मृणाल ठाकूर यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘है जवानी तो इश्क होना है’ हा चित्रपट आता नियोजित तारखेपेक्षा उशिरा प्रदर्शित होणार आहे. बॉक्स ऑफिसवरील क्लॅश टाळण्यासाठी चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रदर्शन तारीख बदलण्याचा निर्णय घेतला असून, हा चित्रपट आता १२ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शक डेव्हिड धवन यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेला हा चित्रपट सुरुवातीला ५ जून रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र, अभिनेता यशचा ‘टॉक्सिक : अ फेरी टेल फॉर ग्रोन-अप्स’ हा चित्रपट ४ जूनला प्रदर्शित करण्याची घोषणा करण्यात आल्यानंतर दोन मोठ्या चित्रपटांमध्ये बॉक्स ऑफिसवर स्पर्धा होण्याची शक्यता निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर ‘है जवानी तो इश्क होना है’च्या निर्मात्यांनी अधिकृत निवेदन जारी करत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलल्याची माहिती दिली. निवेदनात त्यांनी सांगितले की, हा चित्रपट आधीपासूनच ५ जूनला प्रदर्शित करण्याचे नियोजन होते. मात्र, सध्याची परिस्थिती लक्षात घेता प्रदर्शन पुढे ढकलणे अधिक योग्य ठरेल, असे त्यांना वाटले. निर्मात्यांच्या मते, चित्रपटसृष्टीसाठी परस्पर सहकार्याची भावना अधिक महत्त्वाची असून, एकाच दिवशी मोठ्या चित्रपटांची अनावश्यक स्पर्धा होणे टाळणे उद्योगासाठी हितावह ठरते. त्यामुळेच त्यांनी चित्रपट एक आठवडा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले.
.......
‘क्योंकि सास भी कभी बहू थी’मधून बालसुरक्षेचा मुद्दा!
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’मध्ये नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. कौटुंबिक नातेसंबंधांसोबत सामाजिक विषयांवर भाष्य करणाऱ्या या मालिकेच्या अलीकडील भागात बालसुरक्षेसारख्या महत्त्वाच्या विषयावर प्रकाश टाकण्यात आला आहे. अलीकडील कथानकात परीची मुलगी गरिमा हिच्या अपहरणाची घटना दाखवण्यात आली आहे. या प्रसंगानंतर तुलसी तिला ‘गुड टच’ आणि ‘बॅड टच’ यातील फरक समजावून सांगत तिच्या सुरक्षिततेबाबत जागरूक राहण्याचा संदेश देते. मुलांनी अशा परिस्थितीत आपला आवाज उठवणे महत्त्वाचे असल्याचेही या प्रसंगातून दाखवण्यात आले आहे. यासंदर्भात बोलताना अभिनेत्री स्मृती इराणी म्हणाल्या, “मालिका पुन्हा प्रेक्षकांसमोर आणण्यामागे केवळ मनोरंजनाचा हेतू नसून समाजातील काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न आहे. मालिकेत यापूर्वी घरगुती हिंसाचार, वृद्धत्व तसेच महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासारख्या विषयांवरही भाष्य करण्यात आले आहे. बालसुरक्षेसारख्या संवेदनशील विषयावर बोलणे आवश्यक आहे. मुलांना ‘गुड टच’ आणि ‘बॅड टच’ यातील फरक समजणे तसेच त्यांच्या सुरक्षिततेबाबत जागरूक राहणे महत्त्वाचे आहे.” ही मालिका सध्या दररोज रात्री १०.३० वाजता स्टार प्लस वाहिनीवर प्रसारित होते.
........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.