वेणूबाई सपाटे यांना डॉ. नरेंद्र दाभोलकर कार्यगौरव पुरस्कार
तुर्भेतील खाण वस्तीत सामाजिक कार्याची दखल; अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून सन्मान
नवी मुंबई, ता. ९ (वार्ताहर) : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, पनवेल शाखेतर्फे जागतिक महिला दिन आणि सावित्रीबाई फुले स्मृतिदिनानिमित्त तळागाळात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा दरवर्षी गौरव केला जातो. यावर्षीचा ‘नरेंद्र दाभोलकर कार्यगौरव पुरस्कार’ तुर्भे येथील खाण वस्तीत सामाजिक कार्य करणाऱ्या वेणूबाई सपाटे यांना प्रदान करण्यात आला.
पुणे येथील वकील व समितीच्या संविधान जागर विभागाच्या कार्यवाह परिक्रमा खोत यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. या वेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिव श्रुती म्हात्रे प्रमुख उपस्थित होत्या. मानपत्र, पुस्तके आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
वेणूबाई सपाटे या तुर्भेतील खाण वस्तीत लहान मुलांच्या शिक्षणापासून कुटुंबातील समस्या आणि वस्तीतील विविध सामाजिक प्रश्नांवर अनेक वर्षे नि:स्वार्थपणे कार्यरत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत समितीकडून त्यांचा सन्मान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारताना मुलींनी शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे, यासाठी पुढेही प्रयत्न करीत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
चौकट
लिंगभाव समतेवर भर
या वेळी बोलताना ॲड. परिक्रमा खोत यांनी समाजात महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याची गरज अधोरेखित केली. महिलांसाठी सुरक्षित जागा आपण घरातही निर्माण करू शकलो नाही, हे समाजाचे अपयश असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच श्रुती म्हात्रे यांनी समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन अधिक दृढ करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.