जिल्हा परिषद शाळांच्या सुरक्षेचा प्रश्न
१,३२८ पैकी ५२४ शाळांतच सीसीटीव्ही; ८०४ शाळा अद्याप प्रतीक्षेत
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १० : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ठाणे जिल्हा परिषदेच्या बहुतांश शाळा या महामार्ग अथवा मुख्य रस्त्यांच्या कडेला आहे. त्यात या रस्त्यांवरून वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच विद्यार्थ्यांची सुरक्षा अबधित राहो, यासाठी ठाणे जिल्हा परिषदेने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करून जिल्हा परिषदेच्या शाळांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार २०२२ मध्ये ठाणे जिल्हा परिषदेच्या २७ शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात आले होते. त्यानंतर सुमारे चार वर्ष उलटून गेल्यानंतर १ हजार ३२८ शाळांपैकी अवघ्या ५२४ शाळांमध्येच सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात आले असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. तर, उर्वरित ८०४ शाळांमध्ये सीसीटीव्ही कधी बसविणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दुर्गम व आदिवासी पाड्यांवर जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. त्यातील बहुतांश शाळा ह्या रस्त्याकडेला आहेत. त्यामुळे शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी शाळेबाहेर पडत असताना अपघाताची शक्यता आहे. तसेच अनेक शाळांना संरक्षक भिंती बांधण्यात आल्या नाहीत. तसेच अनेक शाळांच्या आवारातून बालके चोरीला जाण्याच्या घटना देखील घडत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्याचबरोबर शाळांच्या आवारात घडणाऱ्या गैरप्रकारांना आळा बसावा, यासाठी प्रत्येक शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसवल्यास विद्यार्थ्यांच्या सुरक्षेमध्ये वाढ होणार आहे. या उद्देशाने तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब दांगडे यांनी २०२२ साली जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. त्यावेळी २७ शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात आली होती. त्यानंतर सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याने कामाला ब्रेक लागला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानंतर सुमारे चार वर्षानंतर जिल्हा नियोजन समितीमार्फत सन २०२४-२५ मधील उपलब्ध तरतुदीतून पहिल्या टप्प्यात एकूण ५४२ शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचे कामकाज सुरू करण्यात आले आहे.
दरम्यान, जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आणि शाळांमधील शैक्षणिक वातावरण अधिक सुरक्षित आणि पारदर्शक ठेवण्यासाठी ही यंत्रणा महत्त्वाची ठरणार आहे. शाळेच्या परिसरातील हालचालींवर लक्ष ठेवणे, अनुचित प्रकारांना प्रतिबंध करणे आणि विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे या दृष्टीने ही सीसीटीव्ही योजना राबविण्यात येत आहे.
तालुकावार स्थिती (पहिल्या टप्प्यातील काम)
तालुका सीसीटीव्ही संख्यास्थिती
भिवंडी ३०८ १००% पूर्ण
कल्याण १२० १००% पूर्ण
अंबरनाथ ९६ पूर्ण
अंबरनाथ (इतर) १८ प्रगतीपथावर
भविष्यातील नियोजित काम
सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजीत यादव यांच्या पुढाकारामुळे २०२५-२६ च्या निधीतून उर्वरित शाळांचे काम मार्गी लावले जात आहे. यात मुरबाड गटातील ३२९ आणि शहापूर गटातील ४५७ शाळांचा समावेश आहे. शिक्षण विभागाच्या दाव्यानुसार, या शाळांमधील सर्व सीसीटीव्ही यंत्रणा एप्रिल २०२६ अखेरपर्यंत कार्यान्वित होणार आहेत.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत जिल्हा परिषद शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचे काम शीघ्रतेने करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात ५२४ शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात आले असून उर्वरित शाळांमध्येही शीघ्रतेने सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात येत आहे. यामुळे शाळांमधील वातावरण अधिक सुरक्षित व शिस्तबद्ध राहण्यास मदत होणार आहे.
- बाळासाहेब राक्षे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, ठाणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.