कोकण-मुंबई पट्ट्यात उष्णतेची तीव्र लाट
कल्याण-डोंबिवलीत तापमान ४२ अंशावर
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १० : कोकण आणि मुंबई महानगर परिसरात सध्या उष्णतेची तीव्र लाट जाणवत आहे. अनेक शहरांमध्ये तापमानाचा पारा ४० अंशावर गेला आहे. कल्याण-डोंबिवलीमध्येही तापमानाने चाळिशी ओलांडत थेट ४२ अंशापर्यंत मजल मारल्याने नागरिक हैराण झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असून, यंदाच्या वर्षातील हे उच्चांकी तापमान असल्याची माहिती कोकण हवामान अभ्यासक अभिजित मोडक यांनी दिली.
हवामानतज्ज्ञांच्या मते, सध्या प्रतिचक्रवाती (ॲन्टीसायक्लोनिक) हवामान स्थितीचा प्रभाव निर्माण झाल्याने समुद्राकडून मिळणारा थंडावा कमी झाला आहे. त्यामुळे किनारपट्टीपासून थोड्या अंतरावर असलेल्या भागांमध्ये कोरड्या खंडीय उष्णतेचा प्रभाव वाढला असून, तापमान झपाट्याने वाढत असल्याचे मोडक यांनी सांगितले. सोमवारी (ता. ९) कोकणातील कमाल तापमानाच्या नोंदींनुसार किनारपट्टीपासून आतल्या भागातील अनेक ठिकाणी तापमान सरासरीपेक्षा पाच ते सात अंश सेल्सियसने अधिक नोंदविले गेले.
सामान्यतः कोकण किनारपट्टी भागात दुपारच्या सुमारास समुद्राकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे तापमान काही प्रमाणात नियंत्रणात राहते. मात्र सध्या समुद्री वारा उशिरा सुरू होत असल्याने सकाळपासून दुपारपर्यंत तीव्र उष्णता जाणवत आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळेत अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी पिणे तसेच उष्माघातापासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात आले आहे.
काही प्रमुख शहरांमधील तापमान
शहर आकडेवारी (सेल्सियसमध्ये)
कल्याण-डोंबिवली ४२
विक्रमगड ४३.५
महाड ४३.२
भातसनगर ४३
कर्जत ४२.७
दापोली ३९
चिपळूण ४२.३
मनोर ४२.१
पनवेल ४१.६
अंबरनाथ ४१.६
बदलापूर ४१.३
ठाणे ४१.२
नेरूळ ४१
विरार ४१
नवी मुंबई विमानतळ परिसर ४१
मुलुंड (पूर्व मुंबई) ४०.९
पालघर ४०.८
वाशी ४०.३
देवनार (दक्षिण-पूर्व मुंबई) ४०.१
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.