अंबरनाथमध्ये अमली पदार्थ जप्त
सव्वा चार कोटींच्या मुद्देमालासह दोन आरोपींना अटक
अंबरनाथ, ता. १० (वार्ताहर) ः अंबरनाथमध्ये अमली पदार्थांविरोधात पोलिसांनी सोमवारी (ता. ९) मोठी कारवाई केली. या कारवाईत सुमारे पाच किलो ३०० ग्रॅम अमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे. त्यासोबतच सव्वा चार कोटी रुपयांचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला असून, दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १६ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
अंबरनाथ पोलिस ठाण्याच्या हद्दीत अमली पदार्थ विक्रीसाठी येत असल्याची गुप्त माहिती तपास पथकातील कर्मचारी चव्हाण यांना गुप्त सूत्रांकडून मिळाली होती. या माहितीच्या आधारे अंबरनाथ पोलिसांनी सापळा रचत सोमवारी (ता. ९) ही कारवाई केली. या कारवाईत पटेल आणि त्याचा साथीदार शेराज या दोघांना पकडण्यात आले. अटक करण्यात आलेला आरोपी पटेल हा गुजरात येथील रहिवासी असून, तो गेल्या दीड महिन्यांपासून अंबरनाथमध्ये वास्तव्यास होता. त्याचा साथीदार शेराज हादेखील अंबरनाथ परिसरात येत-जात होता. मंगळवारी (ता. १०) या दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १६ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. ही कारवाई पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक शब्बीर सय्यद यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या धडाकेबाज कारवाईमुळे अंबरनाथ पश्चिम पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. दरम्यान, या दोघांनी हा अमली पदार्थांचा साठा कोणाला विकण्यासाठी आणला होता? तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा तपास अंबरनाथ पोलिस करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.