विरारमध्ये कर्तृत्ववान महिलांचा गौरव
तारामाई वर्तक जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य
विरार, ता. ११ (बातमीदार) : आगाशी विरार अर्नाळा शिक्षण संस्था संचालित, विरार (पूर्व) येथील पद्मश्री भाऊसाहेब वर्तक महाविद्यालयात जागतिक महिला दिन आणि माजी मंत्री कै. तारामाई वर्तक यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष गौरव सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात वसई-विरार शहर महापालिका क्षेत्रातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १० कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला.
सदर सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी विकास वर्तक होते. प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सुजाता तुस्कानो आणि विशेष अतिथी म्हणून मनपा सभागृह नेते प्रफुल्ल साने उपस्थित होते. या सोहळ्यात राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य आणि साहसी क्षेत्रात योगदान देणाऱ्या महिलांना सन्मानचिन्ह, साडी व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. या महिलांमध्ये प्रीती कुमारी (पश्चिम रेल्वेच्या पहिल्या महिला मोटरमन), रसिका मर्कड (विरारमधील पहिल्या महिला रिक्षाचालिका), कुसुमताई पाटील (ग्रामविकास व सहकार क्षेत्र), रंजना थालेकर व सान्वी यंदे (राजकीय क्षेत्र-नगरसेविका), डॉ. वेल्ला जैन (वैद्यकीय क्षेत्र), श्वेता चौधरी (आरोग्य क्षेत्र), कीर्ती शेंडे (पर्यावरण क्षेत्र), निर्मला वाघेला व हेमा राऊत (स्वच्छता दूत) आणि प्रमुख पाहुण्या सुजाता तुस्कानो यांनी ‘आरोग्य परिचारिका ते राष्ट्रपती पुरस्कार’ हा आपला प्रबोधनात्मक प्रवास उलगडला. विशेष अतिथी प्रफुल्ल साने यांनी वर्तक घराण्याचे सामाजिक व राजकीय योगदान अधोरेखित करत कै. तारामाई वर्तक यांच्या स्मृतींना उजाळा दिला.
रेल्वे मोटरमन प्रीती कुमारी यांनी आपला शैक्षणिक व व्यावसायिक अनुभव सांगितला, तर नगरसेविका रंजना थालेकर यांनी संस्थेच्या माजी विद्यार्थिनी असल्याचा सार्थ अभिमान व्यक्त केला. या १० कर्तृत्ववान महिलांचा प्रवास विद्यार्थ्यांसाठी दीपस्तंभ ठरावा, या हेतूने संस्थेच्या अन्य शाखांमध्येही त्यांना निमंत्रित करून विद्यार्थ्यांशी संवाद घडवून आणावा, असे आवाहन अध्यक्ष विकास वर्तक यांनी केले.
पाहुण्यांचे स्वागत संस्थेचे सदस्य भालचंद्र कवळी, प्राचार्या संगीता डिसिल्वा आणि डॉ. शितल कोरडकर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पदवी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शितल कोरडकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितल वर्तक व निखिल नाईक यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद, विद्यार्थी परिषद आणि पंचक्रोशीतील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.