समित्यांची निवड पुन्हा रखडणार
ठाणे पालिकेतील अर्थसंकल्प थेट महासभेत मांडण्याची शक्यता
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ११ : ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्यानंतर महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुका पार पडल्या. त्यानंतर पहिल्या सर्वसाधारण सभेत स्थायी समिती सदस्यांची निवड होण्याबरोबरच विविध विषय समितींची निवड होणे अपेक्षित होते, परंतु हा निर्णय पुन्हा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. परिणामी, समित्या गठीत न झाल्याने महापालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प थेट विशेष महासभेत सादर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महापालिकेत समिती सदस्यांच्या निवडीसाठी यापूर्वी ५ मार्च रोजी विशेष महासभा बोलावण्याचा निर्णय घेतला होता. त्याबाबतची अधिकृत सूचनादेखील प्रसिद्ध केली होती. मात्र, अचानक हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आणि निवड प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर येत्या १८ मार्चच्या महासभेत समित्या गठित होतील, अशी अपेक्षा होती. मात्र, सध्याच्या घडामोडींनुसार त्या बैठकीतही सदस्य निवडीचा विषय न घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महापालिकेतील राजकीय समीकरणे आणि विविध पक्षांमधील पदवाटपाचे गणित अद्याप अंतिम न झाल्यामुळे हा निर्णय पुढे ढकलला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
समित्यांवरील जागांसाठी विविध पक्षांतील इच्छुकांकडून पडद्यामागे जोरदार हालचाली सुरू असल्याचेही सांगितले जात आहे. स्वीकृत नगरसेवकपदासाठी महापालिका निवडणुकीत पराभूत झालेले काही उमेदवार व पक्षाच्या आदेशानुसार उमेदवारी मागे घेतलेल्या इच्छुकांनी लॉबिंग सुरू केली होती. मात्र, निवड प्रक्रियेची तारीखच निश्चित नसल्याने इच्छुकांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे.
दरम्यान, शिंदे सेनेतील पदाधिकाऱ्यांची एक बैठक नुकतीच पार पडली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या बैठकीत पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांनी स्थायी समितीचे विषय महासभेत घ्या, असे स्पष्ट केले. त्यानुसार १८ मार्च रोजी होणाऱ्या महासभेत स्थायी समिती गठित नसल्याने त्या ठिकाणचे विषय महासभेत घेतले जाणार असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.
शिंदे गटाला सर्वाधिक प्रतिनिधित्व
स्थायी समितीत एकूण १६ सदस्यांची निवड होणार असून, सध्याच्या संख्याबळानुसार शिंदे गटाला सर्वाधिक प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट व एमआयएमलाही काही जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, महापालिकेच्या शिक्षण, आरोग्य, महिला व बालकल्याण, क्रीडा व समाजकल्याण-सांस्कृतिक तसेच झोपडपट्टी पुनर्वसन या पाच विषय समित्यांवर प्रत्येकी नऊ सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. परिवहन समितीत एकूण १३ सदस्य असणार असून, त्यापैकी एक पदसिद्ध सदस्य आणि उर्वरित १२ सदस्यांची निवड महासभेत केली जाणार आहे. परिवहन समितीच्या आर्थिक अधिकारांमुळे या समितीत स्थान मिळवण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चुरस वाढल्याचे दिसून येत आहे.
नवी मुंबईमुळे अडले घोडे
नवी मुंबईत भाजपने परिवहन समितीमध्ये आपल्याच पक्षातील सदस्यांना संधी दिली आहे. त्यामुळे त्याचे पडसाद ठाण्यातही उमटले असल्याची राजकीय चर्चा आहे. याच कारणामुळे ठाण्यातील विषय समित्यांसह परिवहन, स्थायी समिती, स्वीकृत नगरसेवकपदांची निवड लांबणीवर टाकली जात असल्याची माहिती शिंदे सेनेतील एका नेत्याने दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.