ग्रामीण महिलांच्या स्वप्नांना ‘उमेद’चा आधार
कल्याणमध्ये ‘मिनी सरस’ प्रदर्शन
वज्रेश्वरी, ता. ११ (बातमीदार) : ग्रामीण भागातील महिलांच्या हाताला काम आणि उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी ठाणे जिल्हा परिषद आणि ‘उमेद’ अभियानाच्या वतीने कल्याणमध्ये ‘जिल्हास्तरीय व मिनी सरस विक्री प्रदर्शना’चे आयोजन करण्यात आले आहे. महिलांच्या कल्पकतेला मर्यादा नसून, त्यांच्या जीवनात आर्थिक परिवर्तन घडवणे हेच आमचे ध्येय आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी उद्घाटनप्रसंगी केले.
कल्याणच्या कर्णिक रोडवरील यशवंतराव चव्हाण मैदानावर (मॅक्सी ग्राउंड) हे प्रदर्शन १० ते १४ मार्चदरम्यान भरवण्यात आले आहे. यामध्ये जिल्ह्यातील सुमारे २०० महिला सहभागी झाल्या असून १०० स्टॉल्सच्या माध्यमातून हस्तकला, घरगुती उत्पादने आणि अस्सल ग्रामीण खाद्यपदार्थांची मेजवानी नागरिकांसाठी उपलब्ध आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी मार्गदर्शन करताना सांगितले, की ठाणे जिल्ह्यातील अधिकाधिक महिलांना ‘लखपती दीदी’ (वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांहून अधिक) बनवण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. सक्षमीकरण, उत्पादनांची गुणवत्ता, ब्रँडिंग आणि बँकिंग लिंकवेज या ‘दशसूत्री’ कार्यक्रमाद्वारे महिलांना व्यावसायिक बळकटी दिली जात आहे. जिल्ह्यात सध्या ११ हजारांहून अधिक बचत गट सक्रिय असून एक लाखाहून अधिक महिला या अभियानाशी जोडल्या गेल्या आहेत. नागरिकांनी मोठ्या संख्येने या प्रदर्शनाला भेट देऊन ग्रामीण महिलांच्या कष्टाला दाद द्यावी आणि दर्जेदार वस्तूंची खरेदी करून त्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन प्रकल्प संचालक अजिंक्य पवार यांनी केले आहे.
डिजिटल मार्केटची जोड
ग्रामीण उत्पादनांना केवळ प्रदर्शनापुरते मर्यादित न ठेवता, त्यांना व्यापक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रशासनाने विशेष पावले उचलली आहेत. वन स्टेशन-वन प्रोडक्टअंतर्गत रेल्वे आणि बस स्थानकांवर बचत गटांचे स्टॉल्स उभारले आहेत. तसेच अमेझॉन आणि ‘उमेद मार्ट’च्या माध्यमातून ऑनलाइन विक्रीवर भर देण्यात येत आहे. शहरातील मोठ्या मॉल्समध्येही उत्पादनांच्या विक्रीसाठी संधी उपलब्ध होणार आहे.
प्रदर्शनातील आकर्षणे :
खाद्य जत्रा : ग्रामीण चवीचे २० हून अधिक खाद्यपदार्थ स्टॉल्स
हस्तकला : घरगुती मसाले, लोणची, पापड, वस्त्रोद्योग आणि पारंपरिक वस्तू
वेळ : दररोज सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत (१४ मार्चपर्यंत)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.