उल्हासनगर, ता. ११ (वार्ताहर) : आंतरराष्ट्रीय इंधन बाजारातील अस्थिरतेचा थेट फटका मुंबईसह उपनगरातील हॉटेल व्यवसायाला बसत असून, उल्हासनगरमधील हॉटेल, धाबे आणि पोळी-भाजी केंद्र चालवणाऱ्या लहान व्यावसायिकांची चिंता वाढली आहे. वाढते खर्च, अनिश्चित पुरवठा आणि ग्राहकांचे मर्यादित बजेट या तिहेरी कात्रीत स्थानिक खाद्य व्यवसाय सापडले आहेत.
उल्हासनगरमध्ये मोठ्या प्रमाणावर हॉटेल्स, फास्टफूड सेंटर, धाबे तसेच घरगुती पातळीवर चालवली जाणारी पोळी-भाजी केंद्रे कार्यरत आहेत. अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह या व्यवसायांवर अवलंबून आहे. हॉटेलचालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचा दर आधीच जास्त असल्याने त्यातील वाढ थेट व्यवसायाच्या खर्चावर परिणाम करत आहे. एका मध्यम आकाराच्या हॉटेलला दिवसाला दोन ते तीन सिलिंडर लागतात. त्यामुळे महिन्याचा गॅस खर्च मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दुसरीकडे ग्राहकांची संख्या कमी होऊ नये म्हणून जेवणाचे दर वाढवणे शक्य नाही. अनेक हॉटेल मालक आर्थिक तणावात व्यवसाय चालवत असल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय उल्हासनगरमध्ये मोठ्या प्रमाणावर चालणाऱ्या पोळी-भाजी केंद्रांनाही या परिस्थितीचा मोठा फटका बसत आहे. गॅसच्या वाढलेल्या किमतीमुळे त्यांचा खर्च वाढला असून, काही महिलांना दररोजचा व्यवसाय टिकवणे कठीण होत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली. गॅस वितरकांच्या माहितीनुसार घरगुती गॅस पुरवठा सध्या सुरळीत असला तरी व्यावसायिक गॅसच्या मागणीत अचानक वाढ झाल्याने काही ठिकाणी सात ते आठ दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. आगामी काळात ही परिस्थिती कायम राहिल्यास हॉटेल आणि खाद्य व्यवसायावर आणखी गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.
हॉटेल व्यवसाय पूर्णपणे गॅसवर अवलंबून आहे. एका हॉटेलला दिवसाला दोन ते तीन सिलिंडर लागतात, त्यामुळे गॅस महाग झाला की थेट रोजच्या खर्चात मोठी वाढ होते. ग्राहकांना जेवणाचे दर वाढवून देणे शक्य नसल्याने अनेक लहान हॉटेलचालकांना तोट्यात व्यवसाय चालवण्याची वेळ आली आहे. सरकारने दरांवर नियंत्रण ठेवून पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.
- उदय शेट्टी, सदस्य, उल्हासनगर हॉटेल असोसिएशन
काही वर्षांपूर्वी सरकारने ‘चूल बंद करा आणि गॅस वापरा’ असे सांगत सर्वांना एलपीजीकडे वळवले. आम्हीही त्यानुसार संपूर्ण व्यवसाय गॅसवर चालवू लागलो. मात्र आता गॅसच्या दरवाढीमुळे लहान खानावळ चालकांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. सरकारने गॅसचा पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा पर्याय म्हणून रॉकेल किंवा लाकूड उपलब्ध करून द्यावे.
- ऋषिकेश गोडगे, श्री समर्थ कृपा खानावळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.