मोहिनी जाधव : सकाळ वृत्तसेवा
बदलापूर, ता. १२ : इराण-इस्रायल-अमेरिका यांच्यात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचे पडसाद आता देशातील गणेशमूर्ती निर्यात उद्योगावर उमटू लागले आहेत. विशेषतः पर्यावरणपूरक शाडूच्या गणेशमूर्ती परदेशात पाठवणाऱ्या उद्योगांना कच्च्या मालाच्या तुटवड्यामुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
महाराष्ट्रातील अनेक भागांतून दरवर्षी लाखो शाडूच्या गणेशमूर्ती परदेशात निर्यात केल्या जातात. अमेरिकेसह विविध देशांमध्ये राहणाऱ्या भारतीयांसाठी या मूर्तींसह गणेशोत्सवात वापरल्या जाणाऱ्या विविध पूजावस्तूंची मोठ्या प्रमाणात मागणी असते. मात्र सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे या निर्यात प्रक्रियेत अडथळे निर्माण होत आहेत. सध्या गणेशमूर्ती सुरक्षितपणे परदेशात पाठवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विशेष फोम पॅकेजिंगचा तुटवडा निर्माण झाला आहे. हा फोम प्लॅस्टिकच्या विशेष गोळ्यांपासून तयार केला जातो. हे कच्चे साहित्य मोठ्या प्रमाणावर परदेशातून आयात केले जाते, तसेच त्यांना फुलवण्यासाठी लागणारा गॅसही आयातीवर अवलंबून असतो. युद्धामुळे या कच्च्या मालाचा पुरवठा विस्कळित झाल्याने पॅकेजिंगसाठी लागणाऱ्या फोमच्या किमती तब्बल ७० ते ८० टक्क्यांनी वाढल्या आहेत.
परदेशातील ग्राहकांनी डिसेंबरमध्येच गणेशमूर्तींच्या ऑर्डर नोंदविल्याने त्या ठरलेल्या दरातच पूर्ण कराव्या लागत आहेत. त्यामुळे वाढलेल्या खर्चाचा भार उद्योजकांनाच सहन करावा लागत आहे. बदलापूरमधील चिंतामणी क्रीएशनचे संचालक आणि तरुण उद्योजक निमेश जनवाड यांचा पर्यावरणपूरक शाडूच्या गणेशमूर्तींच्या निर्यात व्यवसायही सध्या मोठ्या अडचणीत सापडला आहे.
काही समुद्री मार्गांवर निर्बंध आल्यामुळे निर्यात कंटेनरच्या भाड्यातही मोठी वाढ झाली आहे. परिणामी, गणेशमूर्ती परदेशात पाठवण्याचा एकूण खर्च वाढला आहे. कोरोनाकाळात दीर्घकाळ ठप्प झाल्यानंतर हळूहळू सावरत असलेला गणेशमूर्ती निर्यात उद्योग आता पुन्हा एकदा जागतिक परिस्थितीमुळे अनिश्चिततेच्या छायेत आल्याची चिंता या क्षेत्रातील उद्योजकांकडून व्यक्त केली जात आहे.
हजारो कामगारांवर बेरोजगारीचे सावट
शेकडो कामगारांचे या उद्योगाशी रोजगार जोडलेले आहेत. पेण येथील कारखान्यात सुमारे ३०० कामगार, तर बदलापूरमध्ये शंभरहून अधिक कामगार या व्यवसायावर अवलंबून आहेत. त्यामुळे परिस्थिती आणखी बिघडल्यास हजारो कुटुंबांवर बेरोजगारीचे संकट कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारने या परिस्थितीकडे लक्ष देत कच्च्या मालाचा पुरवठा, निर्यात प्रक्रियेतील अडचणी आणि वाहतूक खर्च यावर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी लघुउद्योजकांकडून केली जात आहे.
कोरोनानंतर मोठ्या मेहनतीने आम्ही पुन्हा व्यवसाय उभा केला. दरवर्षी लाखो गणेशमूर्ती परदेशात पाठवत असताना सध्याच्या युद्धामुळे कच्चा माल, पॅकेजिंग आणि कंटेनरचे दर प्रचंड वाढले आहेत. तरीही परदेशातील ग्राहकांचा विश्वास टिकवण्यासाठी आम्ही सध्या ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर मूर्ती निर्यात करत आहोत. ही परिस्थिती लवकर सुरळीत झाली नाही, तर लघुउद्योगांसमोर मोठे संकट उभे राहू शकते. सरकारने या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन उद्योग आणि कामगारांना दिलासा देणे गरजेचे आहे.
- निमेश जनवाड, उद्योजक चिंतामणी क्रीएशन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.